आयपीएलमधील प्रत्येक संघाकडून वैविध्यपूर्ण गोलंदाजीला प्राधान्य दिले जात आहे. यंदा या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये लेगस्पिन गोलंदाजांनी अतिशय प्रभावशाली व लक्षवेधक कामगिरी केली आहे, असे भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सांगितले.

‘‘आयपीएलमध्ये फलंदाज सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत खेळतात. त्यांना रोखण्यासाठी व बाद करण्यासाठी अनेक लेगस्पिनला जास्त प्राधान्य देत असतात. रविचंद्रन अश्विनसारखा अनुभवी गोलंदाजही ऑफ-स्पिनपेक्षा लेगस्पिन गोलंदाजीला प्राधान्य देत असतो,’’ असे कपिल यांनी सांगितले.

मयांक मरकडे (मुंबई इंडियन्स), रशीद खान (सनरायझर्स हैदराबाद), मुजिबूर रेहमान (किंग्ज इलेव्हन पंजाब), युजवेंद्र चहल (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) या लेगस्पिन गोलंदाजांनी यंदा आतापर्यंत लक्षवेधक यश मिळवले आहे. त्या बाबत कपिल देव म्हणाले, ‘‘लेगस्पिन गोलंदाजांना एवढे यश कसे मिळत आहे, याचे कारण शोधणे अवघड आहे. मात्र अन्य गोलंदाजांपेक्षा हे गोलंदाज अचूक टप्पा व दिशा ठेवत चेंडू टाकत असल्यामुळेच त्यांना यश मिळत आहे. मयांकच्या गोलंदाजीने मी खूप प्रभावित झालो आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने राजस्थानविरुद्ध कर्ण मेहता व इम्रान ताहीर या दोन फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती तीदेखील हरभजन सिंग या श्रेष्ठ गोलंदाजास वगळून. यावरूनच लेगस्पिनला किती महत्त्व दिले जात आहे, याची कल्पना येऊ शकते.’’

द्रुतगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारविषयी कपिल म्हणाले, ‘‘गेल्या तीन वर्षांमध्ये त्याच्या कामगिरीत परिपक्वता आली आहे. तो विचारपूर्वक गोलंदाजी करीत आहे, तसेच शेवटच्या फळीत खात्रीलायक उपयुक्त फलंदाज म्हणून त्याच्यावर भरवसा ठेवावा अशीच त्याची कामगिरी होत आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाजीबाबत विविधता दिसून येत असली तरी अद्यापही हा खेळ फलंदाजांचाच मानला जात आहे.’’