मेलबर्न : पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी आयोजकांकडून नियोजन सुरू झाले आहे. कमी प्रेक्षकांची उपस्थिती आणि खेळाडूंसाठी जैवसुरक्षित वातावरण असे चित्र या स्पर्धेत बघायला मिळू शकते.

‘टेनिस ऑस्ट्रेलिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रेग टिले हे आगामी अमेरिकन आणि फ्रेंच खुल्या ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धाचे आयोजन कशा प्रकारे करण्यात येते, याकडेही लक्ष देणार आहेत. ‘‘जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे आयोजन कशा प्रकारे करायचे याचे नियोजन सुरू केले आहे. सुरक्षित अंतराचे भान राखता प्रेक्षकांची संख्या कमी ठेवण्यावर भर असणार आहे. खेळाडूंना संपूर्णपणे जैवसुरक्षित वातावरणात ठेवण्यात येणार असून परदेशी प्रेक्षकांना प्रवेश मिळणार नाही,’’ असे टिले यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, ‘‘परदेशी खेळाडूंना ऑस्ट्रेलियात आल्यावर काही दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. तसेच स्पर्धेसाठी जी जैवसुरक्षित हॉटेल्स निवडण्यात येतील त्याच ठिकाणी मुक्काम करावा लागणार आहे. त्यांची अधूनमधून करोना चाचणीही घेण्यात येईल. त्याशिवाय स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी सील केलेल्या वाहनांमधूनच प्रवास करावा लागेल.’’  मेलबर्न आणि व्हिक्टोरिया राज्यातील प्रेक्षकांनाच प्रवेश देण्याचा विचार असून जर आंतरराष्ट्रीय सीमांवरील निर्बंध उठवले तर न्यूझीलंडच्या प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबत विचार होणार आहे.