लंगडी हा मराठमोळा खेळ देशाची वेस ओलांडून परदेशी मातीमध्ये आपले पहिले पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. आशियाई लंगडी विकास कार्यक्रमांतर्गत भारताचे तीन संघ नेपाळमधील काठमांडू दौऱ्यावर जाण्यासाठी २४ ऑगस्टला रात्री प्रस्थान करणार आहे. या दौऱ्यात मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय लंगडी सामन्यांचा अंतर्भाव आहे.
‘‘आशियाई लंगडी महासंघाच्या आधिपत्याखाली आम्ही लंगडीच्या प्रचार आणि प्रसारासाठी नेपाळ दौऱ्यावर जाणार आहोत. प्रत्यक्षात २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीतील पहिला दिवस नेपाळमधील संघांसोबत लंगडीचा सराव करणार आहोत. त्यानंतर मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहोत. भारत ‘अ’, भारत ‘ब’ आणि नेपाळ यांचा समावेश असलेली पुरुष विभागाची तिरंगी स्पर्धा आणि भारत-नेपाळ यांच्यात महिलांचे सामने या वेळी होणार आहेत. यासाठी तिन्ही संघ, प्रशिक्षक अरुण देशमुख आणि चेतन पागवाड यांच्यासह ५० जणांचे भारतीय पथक सज्ज झाले आहे,’’ अशी माहिती भारतीय लंगडी महासंघाचे सचिव सुरेश गांधी यांनी दिली.
‘‘नेपाळमधील शाळांमध्ये लंगडी खेळाला प्रारंभ झाला आहे. त्यातूनच हे संघ तयार झाले आहेत. ‘यू-टय़ूब’वर पाहून या ठिकाणचे संघ सराव करतात. परंतु आमच्यासोबत खेळल्यावर त्यांना खेळाचे बारकावे लक्षात येतील. त्यानंतर गरज भासल्यास भारतातील प्रशिक्षक नेपाळला पाठविले जातील,’’ असे गांधी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘पुढील वर्षीच्या उत्तरार्धात भारतात पहिल्या आशियाई अजिंक्यपद लंगडी स्पध्रेचे आयोजन करण्यासाठी आम्ही ही तयारी करीत आहोत. महाराष्ट्राला यजमानपद मिळाल्यास मुंबई, पुणे किंवा जळगावला ही स्पर्धा होऊ शकेल. याचप्रमाणे दिल्लीसुद्धा या स्पध्रेच्या आयोजनासाठी उत्सुक आहे. या स्पध्रेत भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ खेळण्याची शक्यता आहे. याच उद्देशाने आम्ही आशियाई लंगडी महासंघातर्फे हा विकास कार्यक्रम राबवत आहोत. नेपाळनंतर आम्ही भूतानच्या दौऱ्यावर जाणार आहोत, तर श्रीलंकेला आम्ही लंगडीची व्हिडीओ चित्रणे पाठविणार आहोत.’’
दरम्यान, रविवारी शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरात मुंबई लंगडी असोसिएशनच्या कार्यकारिणी समितीची बैठक झाली. त्यानंतर लंगडीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातील मुंबईच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाची दारे लंगडीसाठी खुली
मुंबई विद्यापीठाने लंगडी खेळासाठी आपली दारे उघडली असून, यंदापासून लंगडी खेळाचा क्रीडा स्पर्धाच्या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात फक्त महिलांसाठी आंतरमहाविद्यालयीन स्तरावर लंगडी स्पर्धा होणार आहे, अशी माहिती मुंबई लंगडी असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. अरुण देशमुख यांनी दिली.