क्रिकेटविषयक कोणतेही कार्य न करणाऱ्या चार वैद्यकीय महाविद्यालयांच्या संघांव्यतिरिक्त एकंदर १९ क्लब्सची मान्यता काढण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

सर्वसाधारण सदस्यत्व असलेल्या इंडो बर्माह पेट्रोलियम क्लबब आणि गोल्डन टोबॅको स्पोर्ट्स क्लबची मान्यता काढून घेण्यात आली. याचप्रमाणे ए. एफ. फग्र्युसन, कार्बल कॉर्पोरेशन, क्राऊन मिल्स, जीकेडब्ल्यू लि. सँकी डिव्हिजन, ग्लॅक्सो स्मिथक्लिन, ग्रीव्हज कॉटन, मोरारजी मिल्स, नॅशनल रेयॉन, सँडॉझ, सिंडिया, ठाकरसी, वाडिया ग्रुप या कार्यालयीन संघांचे तसेच ग्रँट मेडिकल, नायर, सेठ जी.एस. आणि टोपीवाला नॅशनल या चार वैद्यकीय महाविद्यालयांचे सहसदस्यत्व रद्द करण्यात आले.

डी. एम. सी. सी. स्पोर्ट्स क्लब, जे. के. स्पोर्ट्स क्लब, रापकाटोस ब्रेट अँड कंपनी स्पोर्ट्स क्लब आणि क्लॅरियन्ट स्पोर्ट्स क्लब या चार सर्वसाधारण सदस्यत्व असलेल्या ऑफीस क्लब्सना सहसदस्यत्व देण्यात आले. तसेच वायएमसीए आणि आंतरभंडारी क्रिकेट स्पर्धा समिती या सर्वसाधारण सदस्यत्व असलेल्या मैदान क्लब्सना सहसदस्यत्व देण्यात आले.

थॉमसन यांच्या अकादमीची प्रशंसा

एमसीएच्या गोलंदाजीच्या योजनेत महत्त्वाची भूमिका घेणारे ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांच्या कार्याची पवार प्रशंसा केली. यासंदर्भात कायदेशीर करार करण्यात येईल. मे महिन्यात पुन्हा ही अकादमी कार्यरत होईल, अशी माहिती एमसीएचे संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांनी दिली.

शाहरूखवरील बंदी उठवण्याचे समर्थन

कोलकाता नाइट रायडर्स मालक आणि अभिनेते शाहरूख खान यांच्यावरील पाच वष्रे घालण्यात आलेली बंदी कार्यकारिणी समितीने उठवल्याबद्दल वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, बंदी उठवण्याबाबतची विनंती शाहरूखकडून एमसीएकडे आली होती. त्यावर कार्यकारिणीने चर्चा करून ती उठवण्याचा निर्णय घेतला. मग एमसीएचे आभार मानणारे पत्र शाहरूखने पाठवले होते आणि ‘ट्विटर’वरसुद्धा आपला आनंद प्रकट केला होता.