इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंची करण्यात आलेल्या करोना चाचणीवरुन सावळा गोंधळ सुरु आहे. सोमवारी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ असे तीन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर मंगळवारी आलेल्या अहवालांमध्ये पाकिस्तानच्या आणखी सात खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यामध्ये फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंना पाक क्रिकेट बोर्डाने तात्काळ क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या.
यादरम्यान, मोहम्मद हाफीजने स्वतःच्या जबाबदारीवर केलेल्या करोना चाचणीमध्ये त्याला करोनाची लागण झालेली नसल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे करोना चाचणीवरुन पाक क्रिकेट बोर्डात सध्या सावळागोंधळ सुरु असल्याचं पहायला मिळतंय. ESPNCricinfo ने यासंदर्भातली माहिती दिली आहे. या सर्व परिस्थितीमुळे पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Just in: Mohammad Hafeez, whose name was in the PCB's list of players to have tested positive for Covid-19 yesterday, has tested negative in another test he sought in his personal capacity pic.twitter.com/AjFzK6mD3T— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 24, 2020
इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २९ जणांच्या संघाची घोषणा केली होती. ज्यात काही राखीव खेळाडूंना जागा देण्यात आली होती. बिलाल आसिफ, इमरान बट, मुसा खान आणि मोहम्मद नवाझ हे सध्या पाक संघात राखीव खेळाडू म्हणून आहेत. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानी संघ ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्याआधी स्वतःची करोना चाचणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं होतं.