महेंद्रसिंह धोनीने अखेरीस आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संध्याकाळी धोनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत, आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच सर्व स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या योगदानाबद्दल कौतुक करत आहेत. २०१९ विश्वचषकात उपांत्य फेरीत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं आणि धोनीसाठी भारतीय संघाची दारं बंद झाली. तत्कालीन निवड समितीने आता आम्ही धोनीचा विचार करणार नाही असं जाहीर केलं.

विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनी मार्टिन गप्टीलच्या अचूक थ्रो-वर धावबाद होऊन माघारी परतला होता. धोनी बाद झाला आणि संपूर्ण न्यूझीलंडच्या संघाने मैदानात जल्लोष केला होता. अवघ्या काही मीटरच्या अंतराने धोनी क्रिजमध्ये येऊ शकला नाही आणि गप्टीलच्या चेंडूने डाव साधला. धोनीबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कारकिर्दीचा पहिला वन-डे सामना खेळत असतानाही धोनी धावबादच झाला होता.

२३ डिसेंबर २००४ साली चितगाँव येथे बांगलादेशविरुद्ध वन-डे सामन्यात धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात धोनी मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी आला होता. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात खलिद मसुद आणि तपस बैस्या या जोडीने धोनीला धावबाद करत माघारी धाडलं होतं. धोनीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पदार्पणचं अयशस्वी ठरलं. परंतू यामुळे खचून न जाता धोनीने स्वतःला सिद्ध केलं आणि भारताचा यशस्वी कर्णधार हा मान मिळवला. यानंतर आपल्या अखेरच्या वन-डे सामन्यातही धोनी दुर्दैवाने धावबादच झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थानच मिळालं नाही.