टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा गेले काही महिने दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. या काळात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला भारतीय संघात जागा मिळाली. आतापर्यंत शिवमने भारताकडून ३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये गोलंदाजीत त्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली. मात्र या संधीकडे आपण हार्दिक पांड्याची जागा घेण्यासाठी नाही तर देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचं शिवम दुबेने स्पष्ट केलं, तो पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.

“मी या संधीकडे हार्दिक पांड्याची जागा घेण्याच्या दृष्टीकोनातून पाहत नाहीये. मला माझ्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, आणि या संधीचा मी पुरेपूर वापर करेन. संघातला प्रत्येक जण मला पाठींबा देतो आहे. त्यामुळे मी या वातावरणात स्थिरावलो आहे.” शिवम दुबेने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. भारतीय संघाच्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत शिवम दुबेची भारतीय संघात निवड झालेली आहे.

६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. या वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा दौरा असणार आहे, यानंतर भारतीय संघ २०२० साली न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.