भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आणि यष्टीरक्षक एम.एस धोनीवर संथ फलंदाजीमुळे टीका होत आहे. धोनी सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो. मात्र, इंग्लंड येथे सुरू असलेल्या विश्वचषकात संथ फलंदाजीमुळे टीका होत आहे. धोनीला यष्टीमागे वाऱ्याच्या वेगाने आणि चपळाईने स्टपिंग करताना आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र, विश्वचषकात संथ फलंदाजी आणि यष्टीरक्षकामध्येही धोनी अपयशी ठरल्याचे आकडे समोर आले.

१५ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित धोनीने नेतृत्वाच्या बळावर चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला आहे. पण ३७ वर्षीय धोनीसोबत २०१९ विश्वचषकात सर्व काही ठिक होत नसल्याचे दिसत आहे. धोनीने सात सामन्यात फक्त २२३ धावा केल्या आहेत.

धोनी मैदानावर असतानाही भारताला इंग्लंडकडून ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात धोनीने ३१ चेंडूत नाबाद ४२ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना धोनी मैदानावर असताना गेल्या ४९ सामन्यात भारताला फक्त एकदा पराभवाचा सामना करावा लागला होता. आता त्यात इंग्लंडबरोबरचा आणखी एक पराभवाची भर पडली आहे. धावांचा पाठलाग करताना धोनीचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. २०१९ च्या विश्वचषकात फलंदाजीमध्येच नव्हे तर यष्टीरक्षणातही धोनीचा जलवा दिसला नाही. धोनीने अनेकवेळा यष्टीमागे उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. पण यंदाच्या विश्वचषकात यष्टीमागे धोनीचा प्रभाव दिसला नाही.

यष्टीमागे फलंदाजांना बाद करणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये धोनी तळाला आहे. सर्वात खराब यष्टीरक्षकांमध्ये धोनी तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे फक्त अपगाणिस्तान संघाचे यष्टीरक्षक आहेत. धोनीने सहा सामन्यात दोन झेल आणि फक्त दोन स्टपिंग केल्या आहेत. विश्वचषकात जगभरातील यष्टीरक्षकांचा विचार केल्यास फक्त अफगाणिस्तानचे इकराम अलिखिल आणि मोहम्मद शहजाद यांच्याच पुढे धोनी आहे. यष्टीमागे पाकिस्तानच्या सर्फराज अहमदनेही धोनीपेक्षा जास्त फलंदाजांना तंबूत झाडले आहे. ऐवढेच नव्हे तर यष्टीमागे चेंडू आल्यानंतर बायच्या धावा देण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये डीआरएसला ‘धोनी रिव्यू सिस्टम’ म्हटले जात होते. धोनीने डीआरएस घेतला तर तो योग्य असल्याचे अनेकवेळा पहायला मिळाले. पण इंग्लंडबरोबर जेसन रॉयविरोधात डीआरएस घेण्यास धोनीने मनाई केली. मात्र, जेसन रॉय बाद होता असे नंतर दिसून आले. धोनीचा निर्णय येथेही चुकल्याचे पहायला मिळाले. विराट कोहली डीआरएस घेण्यासाठी प्रत्येकवेळी धोनीची मदत घेतो. डीआरएसबाबतीत धोनीचा निर्णय अंतिम असल्याचे आपण अनेकदा पाहिले. पाकिस्तानबरोबरच्याही सामन्यात धोनीने विराटला एक डिआरएस घेण्यास मनाई केली. नंतर तो फलंदाज बाद असल्याचे समोर आले होते.

प्रत्येक संघाच्या व्यूहरचनेत मोलाची भूमिका बजावतो तो त्या संघाचा यष्टीरक्षक. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातसुद्धा जवळपास प्रत्येक संघाचा यष्टीरक्षक हा त्या संघाचा ‘पाठीचा कणा’ म्हणून कामगिरी बजावत आहे. सलामीवीर, मधली फळी किंवा अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यापासून ते यष्टीपाठून गोलंदाजांना व कर्णधाराला क्षेत्ररक्षण रचण्यासाठी मार्गदर्शन करण्यात यष्टीरक्षकाचे मोलाचे योगदान लाभते. पण महत्वाच्या स्पर्धेत धोनीसारखा खेळाडू रंगात नसल्याने भरातीय संघाला फटका बसत आहे. फलंदाजी, यष्टीरक्षण आणि डीआरएसमध्येही धोनीची जादू दिसत नाही.