हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे सुरू असलेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. नाशिक, ठाणे वि. मुंबई, सांगली वि. पालघर आणि पुणे वि. सोलापूर तर महिलांमध्ये ठाणे वि. सांगली, सातारा वि. उस्मानाबाद, पुणे वि. औरंगाबाद व रत्नागिरी वि. नगर अशा उपांत्यपूर्व फेऱ्या होणार आहेत.

पुरुषांमध्ये मुंबईने जळगाववर १९-९ असा एक डाव आणि १० गुणांनी विजय संपादन केला. या सामन्यात पीयूष घोलमने २ मिनिटे, १० सेकंद संरक्षण केले व चार खेळाडू बाद केले. शुभम शिगवणने २ मिनिटे, १० सेकंद संरक्षण केले व तीन खेळाडू बाद केले. प्रयाग कानगुटकरने १ मिनिट, ४० सेकंद व २ मिनिटे संरक्षण केले तसेच तीन खेळाडू बाद केले. व अनिकेत आडारकरने २ मिनिटे संरक्षण केले व एक खेळाडू बाद केला,

मुंबई उपनगरने साताऱ्याचा १६-११ असा एक डाव आणि ५ गुणांनी पराभव केला. या सामन्यात उपनगच्या ऋषिकेश मूर्चावडेने २ मिनिटे, ४० सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला. प्रतीक देवरेने २ मिनिटे, १० सेकंद संरक्षण केले व दोन खेळाडू बाद केले, हर्षद हातणकरने नाबाद २ मिनिटे संरक्षण केले व तीन खेळाडू बाद केले.

महिलांमध्ये ठाण्याने जालन्याचा २५-५ असा धुव्वा उडवला. ठाण्याच्या रेश्मा राठोडने ३ मिनिटे, २० सेकंद संरक्षण करून दोन खेळाडू बाद केले, अश्विनी मोरेने ३ मिनिटे, २० सेकंद संरक्षण केले, मीनल भोईरने २ मिनिटे, ३० सेकंद संरक्षण केले व पाच खेळाडू बाद केलेण् पूजा फरगडेने सात खेळाडू बाद केले.