मेलबर्न : भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू प्रज्ञेश गुणेश्वरन ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रॅँडस्लॅम स्पर्धेची मुख्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला. गतवर्षी चारही ग्रॅँडस्लॅम खुल्या टेनिस स्पर्धामध्ये त्याने मुख्य फेरी गाठली होती.

प्रज्ञेशचा पात्रता फेरीतील अखेरच्या लढतीत लॅटव्हियाच्या एर्नेस्ट गल्बिसकडून ६-७, २-६ पराभव झाला. पहिला सेट टायब्रेकवर गेला होता. मात्र प्रज्ञेश अपयशी ठरला. दुसऱ्या सेटमध्ये ०-३ पिछाडीतून प्रज्ञेशचा खेळ सावरला नाही. एक तास आणि २० मिनिटे ही लढत रंगली. याबरोबरच भारताचे पुरुष आणि महिला एकेरीतील आव्हान पात्रता फेरीतच संपले आहे. विशेष म्हणजे प्रज्ञेशने यंदा पात्रता फेरीतील याआधीच्या लढतींत सरस कामगिरी केली होती. पात्रता फेरीतील पहिल्या लढतीत प्रज्ञेशने ऑस्ट्रेलियाच्याच वाईल्डकार्डद्वारे खेळणाऱ्या हॅरी बोर्चियरचा पराभव केला होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या फेरीतील लढतीत प्रज्ञेशने जर्मनीच्या यानिक यॅनमनचा रंगतदार लढतीत पराभव केला होता.

अन्य एकेरीच्या लढतींमध्ये याआधी सुमीत नागलला पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात इजिप्तच्या मोहम्मद साफवतकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याशिवाय रामकुमार रामनाथनचाही सलामीलाच पराभव झाला होता. महिला एकेरीत भारताकडून एकमेव अंकिता रैना सहभागी झाली होती. मात्र तिचादेखील पात्रता फेरीत पहिल्याच लढतीत पराभव झाला होता.