क्रीडा दिनाचे औचित्य साधून आज देशातील ‘क्रीडारत्नां’चा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केलेली बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, कुस्तीमध्ये कांस्य पदकाची मानकरी साक्षी मलिक, जिम्नॅस्टिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांना खेलरत्न या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले, तर एकूण सहा प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात क्रिकेटपटू विराट कोहली आणि इशांत शर्मा यांना घडविणारे राजकुमार शर्मा, दीपा कर्माकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वेर नंदी, अॅथलेटिक्स प्रशिक्षक नागापुरी रमेश, बॉक्सिंगचे प्रशिक्षक सागर धायल यांचा समावेश आहे, तर एस.प्रदीप कुमार आणि महावीर फोगट यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.
याशिवाय, एकूण १५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार बहाल करण्यात आला. यात धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, बॉक्सर शिवा थापा आणि कुस्तीपटू विनेश फोगट यांचा समावेश आहे.
गेल्या चार वर्षात क्रीडा क्षेत्रात दिलेल्या अमुल्य योगदानाच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार देण्यात आले. दिवंगत महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज पुरस्कार वितरण करण्यात आले.
WATCH: Rio Olympics Silver Medallist PV Sindhu conferred with Rajiv Gandhi Khel Ratna Award, in Delhi.https://t.co/MAO2ujWGSK
— ANI (@ANI) August 29, 2016
पुरस्कार विजेते-
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार- पी.व्ही.सिंधू (बॅडमिंटन), दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक्स), जीतू राय (नेमबाजी) आणि साक्षी मलिक (कुस्ती)
द्रोणाचार्य पुरस्कार- नागापुरी रमेश (अॅथलेटिक्स), सागर मल धायाल (बॉक्सिंग), राजकुमार शर्मा (क्रीकेट), बिश्वेश्वर नंदी (जिम्नॅस्टिक्स), एस.प्रदीप कुमार (जलतरण, जीवनगौरव), महावीर फोगट (कुस्ती, जीवनगौरव)
अर्जुन पुरस्कार– रजत चौहान (तिरंदाजी), ललित बाबर (धावपटू), सौरव कोठारी (बिलियर्ड्स आणि स्नूकर), शिवा थापा (बॉक्सिंग), अजिंक्य रहाणे (क्रीकेट), सुब्राता पौल (फुटबॉल), रानी (हॉकी), व्हीआर रघुनाथ (हॉकी), गुरूप्रीत सिंग (नेमबाज), अपूर्वी चंडेला(नेमबाज), सौम्यजित घोष (टेबल टेनिस), विनेश फोगट (कुस्ती), अमित कुमार (कुस्ती), संदीप सिंग मान (पॅरा-अॅथलेटिक्स), विजेंद्र सिंग (बॉक्सिंग)