ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर भारताने कांगारुंचा पहिला डाव १९१ धावांत संपवत ५३ धावांची आघाडी घेतली होती. परंतू दुसऱ्या डावात जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी भारताच्या डावाला खिंडार पाडलं. भारतीय संघाकडून पृथ्वी शॉचं दोन्ही डावांतलं फलंदाजीतलं अपयश आणि गलथान क्षेत्ररक्षण हा चर्चेचा विषय ठरला. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी यांनी भारताच्या पराभवानिमीत्ताने सदोष संघनिवडीवर भाष्य केलं आहे.

अवश्य वाचा – दुसऱ्या कसोटीत पृथ्वी शॉला संघात जागा मिळणं कठीण – झहीर खान

“या सामन्यात पृथ्वी शॉ एकटाच अपयशी ठरलेला नाही, त्याची निवड करणारेही अपयशी ठरलेत. तो ज्या फॉर्मात होता आणि त्याची फलंदाजी पाहता सर्वप्रथम त्याची संघात निवडच व्हायला नको होती. त्यामुळे माझ्या दृष्टीने तो अपयशी ठरणारच होता. शुबमन गिलला संधी मिळायला हवी होती. त्याचं फलंदाजीचं तंत्र हे अधिक चांगलं आहे. पृथ्वी यापुढे चांगली कामगिरी करणार नाही असं माझं म्हणणं नाही, त्याचं भविष्य उज्वल आहे. पण या क्षणाला त्याला दोष देऊन चालणार नाही. त्याची निवड करणंच चुकीचा निर्णय होता.” मूडी ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अवश्य वाचा – It hurts ! निराशाजनक पराभवानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने १ बाद ९ अशी मजल मारली. दिवसाअखेरीस ६२ धावांची आघाडी मिळवलेल्या भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. नाईट वॉचमन जसप्रीत बुमराहला कमिन्सने झटपट माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाला लागलेली गळती थांबलीच नाही. मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, वृद्धीमान साहा, रविचंद्रन आश्विन यासारखे फलंदाज माघारी परतत राहिले. ज्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली. हनुमा विहारी आणि उमेश यादव यांनी अखेरीस झुंज देण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद शमीला फलंदाजी करत असताना दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजी करु शकला नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९० धावांचं सोपं आव्हान मिळालं.

अवश्य वाचा – २०२० मध्ये ‘किंग कोहली’ च्या शतकाची पाटी कोरीच

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या डावात झटपट बाद झालेल्या मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत चांगले फटके खेळले. ऑस्ट्रेलियाची ही जोडी फोडण्याचे प्रयत्न भारताने केले, पण त्यांना यश आलं नाही. अखेरीस पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी झाल्यानंतर मॅथ्यू वेड धावबाद झाला आणि भारताला पहिलं यश मिळालं. यानंतर मार्नस लाबुशेनही आश्विनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना बाद झाला. यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत कांगारुंनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.