भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने, टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी रविचंद्रन आश्विन उपयुक्त ठरु शकतो असं मत व्यक्त केलं आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात आश्विनने दिल्ली संघाचं प्रतिनिधीत्व केलं. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंच्या आगमनानंतर आश्विनला टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये संधी मिळत नाहीये. परंतू दिल्लीकडून खेळत असताना आश्विनने तेराव्या हंगामात महत्वपूर्ण कामगिरी केली.

दिल्लीच्या संघाचा सहायक प्रशिक्षक मोहम्मद कैफने आश्विनच्या आयपीएलमधील कामगिरीचं कौतुक केलं आहे. पॉवरप्लेमध्ये महत्वाचे बळी घेणारा आश्विन भारतीय संघासाठी उपयुक्त ठरेल असं ट्विट कैफने केलं आहे.

जुलै २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आश्विन आपला अखेरचा टी-२० सामना खेळला. २०१७ मध्येच आश्विनने विंडीजविरुद्ध अखेरचा वन-डे सामना खेळला होता. दरम्यान आश्विन सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून भारतीय कसोटी संघात त्याला जागा मिळाली आहे.