इंडियन प्रिमीअर लीग स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ, आपल्या व्यवस्थापनात मोठे बदल करणार असल्याचं समजतंय. गेल्या काही हंगामातली संघाची खराब कामगिरी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. ‘बंगळुरु मिरर’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापन मुख्य प्रशिक्षक डॅनिअल व्हिटोरी, यांना हटवण्याच्या तयारीत आहे. याचसोबत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेंट वुडहील, गोलंदाजी प्रशिक्षक अँड्रू मॅक्डोनाल्ड यांचीही गच्छंती होण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक गॅरी क्रस्टन यांच्याकडे संघाचं प्रशिक्षकपद जाण्याची शक्यता आहे. तसेच किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांचं नावंही चर्चेत असल्याचं समजतंय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची गेल्या काही हंगामातली कामगिरी तितकीशी चांगली राहिलेली नाहीये. त्यामुळे आगामी हंगामासाठी संघ व्यवस्थापन नव्याने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.