विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी मालिकेत २-० ने बाजी मारली. मधल्या फळीत अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी या फलंदाजांनी आपली निवड सार्थ ठरवली. हनुमा विहारीने विंडीजविरुद्ध मालिकेत आपलं पहिलं कसोटी शतक झळकावत ४ डावांमध्ये २८९ धावा काढत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दौऱ्यानंतर हनुमा विहारीने आपण वन-डे क्रिकेटसाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे. तो IANS वृत्तसंस्थेशी बोलत होता.

“वन-डे संघात निवड करायची की नाही हे पूर्णपणे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाच्या हातात आहे. ज्यावेळी माझी संघाला गरज असेल त्यावेळी मी हजर आहे. सध्या माझ्या हातात कसोटी क्रिकेटमधलं स्थान आहे. त्यामुळे चांगली कामगिरीत करत संघात आपलं स्थान कायम राखायचं माझं ध्येय आहे. कामगिरीत सातत्य राखलं तर मला वन-डे संघातही संधी मिळू शकते.” विहारी आपल्याला मिळणाऱ्या संधीबद्दल बोलत होता.

अवश्य वाचा – संघात प्रवेश हवाय मग हे आव्हान पार पाडाच !

विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या संगतीत सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल विचारलं असता विहारी म्हणाला, “गेली अनेक वर्ष हे खेळाडू भारतीय संघाकडून खेळत आहेत. त्यामुळे मला त्यांच्याशी तुलना करायची नाहीये. मात्र आपल्या खेळीचा संघाच्या विजयात हातभार लागला ही भावना सुखावणारी आहे.” विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघासमोर आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.