गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा चांगल्याच फॉर्मात आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ विश्वचषक स्पर्धेत रोहितने ५ शतकं झळकावत आपला फॉर्म सिद्ध केला. यानंतर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या रोहितने कसोटी क्रिकेटमध्येही आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. भारताचा माजी कसोटीपटू आणि मुळचा मुंबईकर असलेल्या वासिम जाफरनेही रोहितच्या फलंदाजीचं कौतुक करताना, त्याच्यात परदेशात द्विशतक झळकावण्याची क्षमता असल्याचं म्हटलं आहे.

“माझ्या मते रोहित शर्माला आता त्याचा खेळ समजायला लागला आहे. त्याच्यात बदल झालाय, तो पूर्वीसारखा खेळत नाही. सामन्यात कुठे शांत राहून फलंदाजी करायची आहे हे त्याला समजायला लागलंय. तुम्ही विश्वचषकातला त्याचा खेळ पाहिला असेल तर तुम्हालाही जाणवेल, ज्या सामन्यांमध्ये गोलंदाजांचा चेंडू स्विंग होत होता तिकडे रोहितने किमान ८-१० षटकं वाट पाहून नंतर फटकेबाजी केली. कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात खेळत असताना रोहितने सुरुवातीची ३०-४५ मिनीटं सांभाळून खेळ केला तर तो तिकडेही द्विशतक झळकावू शकतो”, वासिम आकाश चोप्राच्या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

२०१९ साली घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत रोहित शर्माने कसोटी संघात पुनरागमन केलं. या मालिकेतही धडाकेबाज कामगिरी करत रोहितने कसोटी संघातल्या सलामीच्या जागेवर दावेदारी पक्की केली. नवीन वर्षात न्यूझीलंड दौऱ्यात अखेरच्या टी-२० सामन्यात खेळताना रोहित जखमी झाल्यामुळे त्याला भारतात परतावं लागलं. यानंतर आयपीएलच्या तेराव्या हंगामापासून रोहित पुन्हा मैदानात उतरणार होता…पण करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतीय खेळाडू अजुनही घरातच आहेत.