अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघाने केलेलं दणक्यात पुनरागमन हे चर्चेचा विषय ठरतंय. त्यातच ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या रोहित शर्मानेही आपला क्वारंटाइन कालावधी संपवत संघात दाखल होणार असल्याचे संकेत दिलेत.

परंतू सिडनी येथे रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहितला भारतीय संघात जागा मिळेल की नाही याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर रोहितच्या उपलब्धतेबद्दल भाष्य केलं. “रोहित बुधवारी भारतीय संघात दाखल होतोय. शाररिकदृष्ट्या तो किती तंदुरुस्त आहे याची आम्ही आधी तपासणी करु. तो प्रदीर्घ काळ क्वारंटाइन होता, त्यामुळे तिसऱ्या कसोटीत तो सहभागी होईल की नाही याआधी त्याला नेमकं कसं वाटतंय याचाही विचार करावा लागणार आहे.”

अवश्य वाचा – टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ‘हिटमॅन’ संघात दाखल होण्यासाठी सज्ज

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्माला भारतीय संघात जागा द्यायची असल्यास सलामीच्या जागेतून मयांक अग्रवालला संघाबाहेर जावं लागेलं. दोन्ही कसोटी सामन्यांत मयांकची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. आयपीएलचा तेरावा हंगाम खेळत असताना रोहितला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला वन-डे आणि टी-२० मालिकेत सहभागी होता आलं नव्हतं. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहितला संघात जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.