india tour of australia 2020 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-२० सामन्याच्या मालिकेसाठी हिटमॅन रोहित शर्माची निवड न झाल्यामुळे वादंग माजला होता. त्यावर अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी आपली मतं मांडली होती. बीसीसीआय आणि विराट कोहलीला तर नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं होतं. पण यावर आता स्वत: रोहित शर्मानं स्पष्टीकरण दिलं आहे. आयपीएलमधील एका सामन्यात रोहित शर्माचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे तो काही सामन्यात खेळलाही नव्हता. त्यादरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली होती. त्यामध्ये दुखापतीचं कारण देत रोहित शर्माला वगळण्यात आलं. लगेच मुंबई इंडियन्सनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर रोहित शर्माचा सराव करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर कसोटी सामन्यासाठी रोहित शर्माची निवड करण्यात आली. हे सर्व एकाबाजूला सुरु असताना रोहित शर्मानं कोणतेही वक्तव्य केलं नव्हतं. मात्र, आता स्वत: रोहित शर्मानं यावरुन मौन सोडलं असून एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासाठी आपली निवड न होण्यामागील कारण स्पष्ट केलं आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलियात दौऱ्यात ११ दिवसांत सहा मर्यादित षटकांचे सामने होणार आहेत. त्यामुळेच मी हे सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मला पुनर्वसन प्रक्रियेसाठी साडेतीन आठवडय़ांचा कालावधी हवा होता. जर मी दुखापत सावरण्यास वेळ दिला, तर कदाचित कसोटी सामने खेळू शकेन, अशी आशा होती. मी घेतलेला हा साधा निर्णय इतका जटिल का झाला, हे मलाही कळले नाही.’

आयपीएलमधील बाद फेरीमध्ये खेळण्याच्या निर्णयाबाबत रोहित म्हणाला, ‘‘दुखापत झाल्यानंतर पुढील दोन दिवस मी त्यानंतरचे १० दिवस काय करायचे, ही योजना आखली. मी ‘आयपीएल’च्या पुढील सामन्यांत खेळावे की खेळू नये, हे ठरवले. ऑस्ट्रेलियात खेळण्याविषयी अ, ब किंवा क नावाची व्यक्ती काय बोलते, हे माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाही. ’’

माझी दुखापत गंभीर स्वरूपाची नव्हती, याची मला खात्री होती. परंतु काय घडले, याबाबत मी अनभिज्ञ आहे. परंतु येत्या काही दिवसांत मी ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी सज्ज होईन, अशी आशा रोहितने व्यक्त केली. सध्या रोहित बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत पुनरागमनाची तयारी करीत आहे.