सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड ही भारतीय क्रिकेटमधील दोन बडी नावं. सचिनच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे तर राहुलच्या नावावर सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम आहे. दोघांच्या खेळण्याची शैली प्रचंड वेगळी होती, पण एक गोष्ट मात्र सारखी होती. सचिन आणि द्रविड दोघेही अतिशय संयमी आणि शांत होते. जवळपास २० वर्षांच्या कालावधीत मैदानावर या दोघांना चिडताना, ओरडताना कोणीही पाहिलेले नाही. फार क्वचित प्रसंगी त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. या दोघांमधील सर्वोत्तम खेळाडू निवडणं म्हणजे मोठी कसोटीच आहे. पण पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने आव्हान स्वीकारत या दोघांमधील त्याचा आवडता खेळाडू कोण? याचं उत्तर दिलं आहे.

सचिन तेंडुलकर हा धावा काढण्यात तरबेज होता. तर राहुल द्रविड हा चेंडू खेळून काढण्यात तरबेज होता. शोएब अख्तरने ट्विटरवर चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं. त्यानुसार चाहत्यांना त्याला विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची त्याने झटपट उत्तरं दिली. अख्तरला बिजय कुमार नावाच्या एका चाहत्याने प्रश्न विचारला, “कसोटी क्रिकेटचा विचार करता जर तुम्हाला एकाची निवड करायची असेल तर… कोणता क्रिकेटपटू निवडाल… सचिन की द्रविड?”. या प्रश्नावर अजिबात आढेवेढे न घेता शोएब अख्तरने थेट द्रविडचं नाव घेतलं.

आणखी वाचा- IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे महत्वाचा खेळाडू संघाबाहेर

अख्तरला इतरही प्रश्न विचारण्यात आले होते. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सलामीवीर रोहित शर्मा या दोघांचं एका शब्दात वर्णन काय करशील? असा प्रश्न त्याला चाहत्याने विचारला. त्यावर तो म्हणाला की धोनीला मी ‘युगपुरूष’ (its the name of an era) म्हणेन. रोहितबद्दल मात्र त्याने झकास उत्तर दिलं. रोहितचं वर्णन एका शब्दात करणं कठीण आहे हे सांगताना तो म्हणाला की “(रोहितचं एका शब्दात वर्णन करण्यासाठी) मार्केटमध्ये योग्य शब्द आला की मी नक्की सांगेन.” अख्तरनं गमतीशीर उत्तरं देत चाहत्यांचं चागलंच मनोरंजन केलं.