माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे मत

कसोटी क्रिकेटमधील रंगत कायम टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धात्मक खेळपट्टय़ांवर सामन्यांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रविवारी व्यक्त केली. मुंबई अर्धमॅरेथॉनसंबंधी आयोजित एका कार्यक्रमासाठी सचिन उपस्थित होता. कसोटीतील रंगत अधिक स्पष्ट करण्यासाठी सचिनने सध्या सुरू असलेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील स्टीव्ह स्मिथ विरुद्ध जोफ्रा आर्चर यांच्यातील द्वंद्वांचे उदाहरण दिले.

‘‘कसोटी सामने हा क्रिकेटचा आत्मा असून त्यातील रंगत टिकवण्यासाठी आव्हानात्मक खेळपट्टय़ा तयार करणे फार आवश्यक आहे. कसोटीतील प्रत्येक सत्रामध्ये सामन्याला कलाटणी मिळू शकते. एखाद्या गोलंदाजाचा उत्कृष्ट स्पेल अथवा फलंदाजाची संयमी किंवा आक्रमक फलंदाजी संघाला विजयी करण्यात पुरेशी ठरते. अशावेळी खेळपट्टी कशा स्वरूपाची आहे, हे अधिक महत्त्वाचे ठरते. फक्त फलंदाज शतकांवर शतके झळकावत आहेत, अथवा गोलंदाज फलंदाजांना अक्षरश: स्वस्तात गुंडाळत आहेत, असे सामने पाहणे क्रिकेटप्रेमींना मुळीच आवडत नाहीत,’’ असे सचिन म्हणाला.

‘‘नुकताच झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत आर्चर आणि स्मिथ यांच्यातील कडवी झुंज पाहून चाहत्यांना आनंद झाला. कठीण परिस्थितीत स्मिथने धावा केल्या, तर चेंडूला स्विंग मिळत नसताना आर्चरने ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे कसोटीकडे चाहत्यांचे मन पुन्हा एकदा आकर्षित झाले,’’ असेही सचिनने सांगितले. याव्यतिरिक्त जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटीला नवचैतन्य लाभेल, असेही ४६ वर्षीय सचिनने सांगितले.