सूर्याच्या प्रकोपामुळे अमेरिकन खुल्या स्पर्धेचा दुसरा दिवस माघारसत्राचा ठरला होता. तिसऱ्या दिवशी मात्र पारा खाली उतरल्याने हवामान सुसह्य़ झाले आणि जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या सेरेना विल्यम्स, नोव्हाक जोकोव्हिच यांनी तिसरी फेरी गाठली. राफेल नदाल, गतविजेता मारिन चिलीच तर महिलांमध्ये व्हीनस विल्यम्स, अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का यांनीही विजयी आगेकूच केली.

कॅलेंडर स्लॅमच्या विक्रमासाठी आतुर सेरेनाने जागतिक क्रमवारीत ११०व्या स्थानी असलेल्या नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सवर ७-६, (७-५), ६-३ असा विजय मिळवला. तब्बल ३४ टाळता येण्यासारख्या चुका आणि १० दुहेरी चुकांनंतरही सेरेनाने हा विजय मिळवला. स्टेफी ग्राफने १९८८ साली एका वर्षांतील चारही ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर केली होती. या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी सेरेनाकडे आहे. दुसऱ्या फेरीच्या लढतीत थकवा आणि दुखापती यामुळे सेरेनाचा सूर हरवला होता. पात्रता फेरीचा अडथळा पार करून आलेल्या खेळाडूविरुद्ध जिंकताना सेरेनाला संघर्ष करावा
लागला.
महिला गटातील अन्य लढतीत अमेरिकेच्या मॅडिसन की हिने चेक प्रजासत्ताकच्या तेरेझा स्मिटकोव्हावर ६-१, ६-२ असा विजय मिळवला. व्हीनस विल्यम्सने इरिना फालकोनीवर ३-६, ७-६ (७-२), ६-२ अशी मात केली. पोलंडच्या अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने पोलंडच्याच मागडा लिनेटला ६-३, ६-२ असे नमवले. कॅनडाच्या युझेनी बोऊचार्डने स्लोव्हाकियाच्या पोलोना हरकोग ६-३, ६-७ (२-७), ६-३ असा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रियाच्या आंद्रेस हैदर म्युररचा ६-४, ६-१, ६-२ असा पराभव केला. स्पेनच्या फेलिसिआनो लोपेझने पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत अमेरिकेच्या मर्डी फिशवर ६-२, ३-६, ६-१, ५-७, ६-३ अशी मात केली.
दुखापती आणि खराब फॉर्मच्या ससेमिऱ्यातून बाहेर पडत खेळणाऱ्या राफेल नदालने अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनविरुद्ध अडखळत विजय मिळवला. नदालने ही लढत ७-६ (७-५), ६-३, ७-५ असा विजय मिळवला. मिलास राओनिकने स्पेनच्या फर्नाडो व्हर्डास्कोचा ६-२, ६-४, ६-७ (५-७), ७-६ (७-१) असा पराभव केला. गेल्या वर्षी फेडरर-जोकोव्हिच-नदाल त्रिकुटाची मक्तेदारी मोडत जेतेपदावर कब्जा करणाऱ्या मारिन चिलीचने रशियाच्या इव्हेन्जी डॉन्सकायवर ६-२, ६-३, ७-५ असा विजय
मिळवला.

प्रत्येक गुणासाठी मला झगडावे लागले. मी सर्वोत्तम खेळ करू शकले नाही. पुढच्या सामन्यात मी नेहमीच्या शैलीत खेळू करू शकेन अशी आशा आहे.

सेरेना विल्यम्स
पेस-बोपण्णाची विजयी सलामी
लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा यांनी आपापल्या साथीदारांसह खेळताना विजयी सलामी दिली. लिएण्डरने मिश्र दुहेरीत मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना टेलर हेरी फ्रिट्झ आणि सी. लुई यांच्यावर ६-२, ६-२ अशी मात केली. पुढच्या लढतीत त्यांची लढत युझेनी बोऊचार्ड आणि निक कुर्यिगास जोडीशी होणार आहे. पुरुष दुहेरीत बोपण्णाने फ्लोरिन मर्गेआच्या साथीने खेळताना ऑस्टिन क्रायजेक आणि निकोलस मन्रोई जोडीवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला. पुढच्या लढतीत या जोडीचा मुकाबला मॉरित्झ फ्रास्टेनबर्ग आणि सँटिआगो गोन्झालेझ जोडीशी होणार आहे.