आविष्कार देशमुख

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज जामठा मैदानावर दुसरा एकदिवसीय सामना 

सलामीच्या लढतीत पाहुण्या ऑस्ट्रेलियाला चारीमुंडय़ा चीत केल्यानंतर आता मंगळवारी नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होणारा दुसरा एकदिवसीय सामना भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल. त्यामुळे मालिकेवरील पकड मजबूत करण्याच्या इराद्याने आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाला वर्चस्वासाठी लढावे लागणार आहे.

हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून आरामात विजय मिळवला होता. त्यामुळे पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी कांगारूही प्रयत्नशील असतील. ट्वेन्टी-२० मालिके त अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांना एकदिवसीय सामन्यातही सूर गवसला नाही. त्यामुळे भारताला सलामीची चिंता सतावत आहे. म्हणूनच विश्वचषकासाठीचे प्रयोग म्हणून ट्वेन्टी-२० मालिकेत चमकलेल्या लोकेश राहुलला अंतिम संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.

लोकेशने सोमवारी फलंदाजीचा अधिक काळ सराव करून याचे संके तही दिले. पहिल्या एकदिवसीय सामन्यातील विजयाचे शिल्पकार महेंद्रसिंग धोनी, के दार जाधव यांच्यासह विराट कोहली, अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांच्यावर फलंदाजीची भिस्त राहील. केदार जाधवने नाबाद ८१ धावांची खेळी करताना विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात सहाव्या क्रमांकावर आपली दावेदारी पेश केली आहे. धोनीच्या सातत्यपूर्ण कामगिरीविषयी शंका उपस्थित केली जात होती. मात्र ३७ वर्षीय धोनीने नाबाद ५९ धावा फटकावून आपणच मधल्या फळीतील उपयुक्त फलंदाज असल्याचे सिद्ध करत टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व फिरकीपटू कु लदीप यादव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. कामचलाऊ गोलंदाज म्हणून कर्णधाराने दाखवलेल्या विश्वासावर केदार जाधव खरा उतरला. विजय शंकरला मिळालेल्या संधीचे सोने करण्यात अपयश आले. विजय सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे त्याच्याऐवजी सिद्धार्थ कौल या वेगवान गोलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियावर पहिल्या सामन्यातील पराभवामुळे दडपण आले असले तरी उर्वरित सामन्यांमध्ये खेळ उंचावण्याचे आव्हान पाहुण्यांसमोर असेल. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने पहिल्या एकदिवसीय सामन्यातही चांगली फलंदाजी के ली आहे. परंतु फिंच अजूनही अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. सलामीच्या लढतीतील अर्धशतक झळकावणारा सलामीवीर उस्मान ख्वाजा, मार्कस स्टॉइनिस, पीटर हँडस्कॉब तसेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिके टमध्ये पदार्पण करणाऱ्या अ‍ॅश्टन टर्नरकडून ऑस्ट्रेलियाला भरीव कामगिरीची अपेक्षा आहे.

वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जेसन बेहरेनडॉर्फने पहिल्या सामन्यात चांगला मारा केला. तरीही एकदिवसीय मालिकेत भारताला कमी धावांत रोखण्यासाठी नवे डावपेच लढवावे लागतील. नागपूर येथील दुसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून या सामन्यात ऑस्ट्रेलिया बरोबरी साधणार की भारत २-० अशी आघाडी घेणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

जामठावरील भारताची कामगिरी 

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मदानावर आतापर्यंत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. या तिन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. २८ ऑक्टोबर २००९ साली भारताने ऑस्ट्रेलियावर ९९ धावांनी, ३० ऑक्टोबर २०१३ रोजी सहा गडी राखून आणि १ ऑक्टोबर २०१७ रोजी ७ गडी राखून भारताने कांगारूंवर विजय संपादित केला आहे. त्यामुळे एकंदरीत इतिहास बघता जामठाच्या पाटा खेळपट्टीचा फायदा भारतालाच होण्याची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी तसेच गोलंदाजी तगडी आहे. प्रत्येक सामन्यात फलंदाजी महत्त्वाची असते. त्यामुळे आम्ही तळातील फलंदाजही त्याकडे अधिक लक्ष देत आहोत. जामठा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल आहे की नाही, यापेक्षा गडी बाद करण्यावर माझा अधिक भर असेल. शॉन मार्श, उस्मान ख्वाजा हे फलंदाज माझ्या रडारवर असतील.

कुलदीप यादव, भारताचा फिरकीपटू

कर्णधार आरोन फिंच फॉर्मात नाही, हे म्हणणे योग्य नाही. तो संघात असणे म्हणजे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तो आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष देत आहे. प्रत्येक सामन्याची स्थिती वेगळी असते. हैदरबादचा सामना गमावल्याने थोडे निराश असलो तरी नाउमेद बिलकुल नाही. आम्ही नागपूरचा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करू.

– अ‍ॅडम झाम्पा, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू

भारत-आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरच्या जामठा स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामने रंगले असून तिन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे.

२०११च्या विश्वचषक स्पर्धेतनागपूरच्या जामठा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू, केदार जाधव, विजय शंकर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), डी’अर्सी शॉट, शॉन मार्श, मार्कस स्टॉइनिस, उस्मान ख्वाजा, अ‍ॅलेक्स कॅरे, पीटर हँडस्कॉम्ब, अ‍ॅश्टन टर्नर, अ‍ॅडम झाम्पा, जेसन बेहरेनडॉर्फ, पॅट कमिन्स, अँड्रय़ू टाय, नॅथन कुल्टर-नाइल, नॅथन लिऑन.

*  सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजतापासून

*  थेट  प्रेक्षपण : स्टार  स्पोर्ट्स १