भारताची तिरंदाज दीपिकाचा यंदा पदक जिंकण्याचा निर्धार
पीटीआय, कोलकाता
गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये देशाला पदक जिंकून देऊ शकले नाही, याचे शल्य मनात कुठे तरी बोचतेय. पण या नकारात्मक गोष्टींचा विचार न करता टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिने सांगितले.
रांचीची २७ वर्षीय दीपिका सध्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी आहे. २०१२ लंडन ऑलिम्पिकआधीही दीपिका अग्रस्थानी होती. पण तिला अपेक्षेनुसार कामगिरी करता न आल्याने पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. ‘‘पुन्हा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा माझा इरादा नाही. भूतकाळातील अपयशाचे शल्य बोचत असल्याने थोडेसे दडपण आहे. पण नकारात्मक विचार पूर्णपणे बाजूला सारत यंदा मी फक्त पदकाचेच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे,’’ असेही दीपिकाने सांगितले.