04 August 2020

News Flash

.. तर तोच खेळ पुन्हा पुन्हा!

पुर्वी क्रिकेटपटूंना पैसा मिळत नसला तरी देशप्रेम त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. पण आता जमाना बदलला. रणजीपटू लखपती होऊ लागले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू करोडपती. असे असतानाही खेळाडू

| May 19, 2013 03:41 am

पुर्वी क्रिकेटपटूंना पैसा मिळत नसला तरी देशप्रेम त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. पण आता जमाना बदलला. रणजीपटू लखपती होऊ लागले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू करोडपती. असे असतानाही खेळाडू काळिमा फासणाऱ्या ‘फिक्सिंग’च्या जाळ्यात ओढले जातात, हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. सध्या भांडवलशाहीच्या युगात लोकांना सुरक्षितता हवी आहे आणि ती फक्त पैशांतूनच मिळते ही सवंग विचारप्रणाली त्या मागे आहे, त्यामुळेच सुखात नांदत असतानाही सवंग लालसेपायी हे खेळाडू ‘फिक्सिंग’कडे वळतात. दुसरीकडे संघटनेला याबाबत खेळाडूंच्या मनात कोणतीही भीती निर्माण करता आलेली नाही, मग ती आयसीसी असो किंवा बीसीसीआय. त्यामुळे पकडले गेलो नाही तर आनंदीआनंदच आणि पकडले गेलो तर काही वर्षांची बंदी होईल, त्यानंतर पैशापुढे सारेच झुकतात कळल्यावर उजळ माथ्याने फिरता येईल, ही यामागची धारणा आहे. ‘फिक्सिंग’मध्ये अडकलेला खेळाडू जर खासदार होऊ शकतो, तर आपल्यासाठीही तो मार्ग खुलाच आहेच, ही त्यांची मानसिकता आहे. जेव्हा पहिल्यांदाच ‘फिक्सिंग’चे प्रकरण पुढे आले तेव्हाच आयसीसी किंवा बीसीसीआयने त्यांच्यावर कठोर कारवाई केली असती तर अशी प्रकरणे पुढे घडूच शकली नसती.
जेव्हा मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, मनोज प्रभाकर आणि अजय शर्मा हे खेळाडू दोषी आढळले तेव्हा बीसीसीआयने काय केले? अझर आणि अजयवर आजन्म बंदी घातली, तर जडेजा आणि प्रभाकर यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली. पण यामध्येही या खेळाडूंना बीसीसीआय पाठिशी घालताना दिसते. अझरवर आजन्म बंदी घातली असली, तरी तो यांच्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेला पाहायला मिळतो, अधिकाऱ्यांशी छुप्या गप्पा मारताना दिसतो. जडेजाला बीसीसीआयच्याच आयपीएल सामन्यांसाठी पाहुणा म्हणून बोलवले जाते. जर खेळाडू दोषी आढळले असतील तर त्यांना आपल्या कार्यक्रमात आणि सामन्यांच्या समालोचनासाठी बोलवून, मान-सन्मानाची वागणूक देऊन बीसीसीआय त्यांना पाठिशी घालत चुकीचा पायंडा पाडत आहे. दोषी खेळाडूला सन्मान बीसीसीआयच देते हे युवा पीढीच्या मनावर बिंबवले गेले आहे, त्यांनी ते पाहिले आहे आणि त्यामुळेच युवा पीढी ‘फिक्सिंग’ करण्याची हिम्मत करू शकते. दोषी आढळलो तरी संघटना काही वर्षांनी आपलेसे करेल, हा विश्वास कुठेतरी त्यांच्या मनात आहे. एकिकडे दोषींवर कठोर कारवाई करू, असे बीसीसीआय म्हणत असली तरी कारवाई केल्यावर दोषींना कुरवाळण्याचे कामही त्यांच्याकडून केले जाते. या प्रकरणात जेवढे खेळाडू दोषी आहेत तेवढीच बीसीसीआयही दोषी आहे. बीसीसीआयला आतापर्यंत पारदर्शी कारभार ठेवता आलेला नाही. दाखवायचे आणि खायचे दात बीसीसीआयचे वेगळेच आहेतच.
‘फिक्सिंग’ची जी प्रकरणे आतापर्यंत बाहेर आली आहेत ती मुख्यत्वेकरून पोलिसांनी आणल्याचे दिसते. आयसीसी आणि बीसीसीआय या दोन्ही संस्थांचे भ्रष्टाचारविरोधी विभाग आहेत, पण त्यांनी आतापर्यंत किती असे प्रकार उघडकीस आणले आहेत, हे तेच जाणे. खेळाडू दोषी आढळल्यावर संघटना त्यांच्यावर कारवाई करत असली तरी ती पुरेशी नसल्याचेच समोर आले आहे. जर खेळाडू दोषी आढळले तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचे पाऊल संघटना उचलत नाही आणि इथेच खेळाडूंचे फावते. खेळाडू दोषी आढळला तर त्याला सरळ पोलिसांच्या ताब्यात देऊन खटला त्यांच्यावर चालवायला हवा. कारण खेळाडू जर लालसेपोटी देशाशी, खेळाशी, प्रेक्षकांशी गद्दारी करत असतील, तर त्यांना कुठेच थारा देता कामा नये.
आपण या खेळाडूंबद्दल बोलतो, पण त्यांना काही वेळेला अनेच्छेने दबावाखालीही हे काम करावे लागते आणि त्याच्यामागे मोठी मंडळी असतात. हे छोटे मासे गळाशी लागतात, पण मोठा मासा कधीच सापडत नाही. या मोठय़ा माशांना पकडण्याएवढी आपली व्यवस्था सक्षम आहे का, हा वादाचा विषय आहे. आयपीएलने क्रिकेटला काय दिले, पैसा दिला, खेळाडू श्रीमंत झाले, पण ‘फिक्सिंग’, हवाला, सेक्स रॅकेट, जुगार, सट्टा ही सारी दालनेही उघडी करून दिली. खेळात लिलाव आला, विकत घेणारे उद्योगपती आले, तिथे खेळाडूंकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार? जोपर्यंत समाधान आणि सुख नक्की काय असते, हे जोपर्यंत व्यक्तीला कळत नाही, तोपर्यंत हे असे चालूच राहणार. पण ते असं करायला धजावू नयेत, अशी उदाहरणे व्यवस्थेने, प्रशासनाने त्यांच्यापुढे ठेवायला हवीत. ‘फिक्सिंग’ केल्यावर आपण कोणालाही तोंड दाखवू शकणार नाही, तुरुंगाची हवा खायला लागेल, कारकीर्द संपुष्टात येईल, असे खेळाडूला आपले भविष्य अंधारमय वाटेल, तेव्हा या गोष्टी बंद व्हायला सुरुवात होतील. अन्यथा गेल्या वर्षी पाच खेळाडू दोषी ठरले, यावर्षी आतापर्यंत चार, पुढील वर्षी ही यादी वाढतच जाईल आणि खेळावर होणारे आघात आपणाला उघडय़ा डोळ्याने पाहण्यावाचून गत्यंतर नसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2013 3:41 am

Web Title: then only that play again again
टॅग Ipl,Sports,Spot Fixing
Next Stories
1 पोलिसांची फिल्डिंग!
2 दिल्ली पोलिसांचे चार शहरांमध्ये तपास सत्र
3 कारवाईचा आसूड?
Just Now!
X