भारतात सोमवारी ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरची फिरकी घेतली. करोना व्हायरसमुळे क्रिकेट सामने होत नसल्याने डेव्हिड वॉर्नर आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. याचसोबत तो आपला जास्तीत जास्त वेळ कुटुंबासह टीक टॉकवर डान्स करण्यात किंवा व्हिडीओ बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसून आले आहे. भारतात त्याच्या व्हिडिओचा वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. त्यावरूनच अश्विनने त्याची खिल्ली उडवली.

वॉर्नर भारतीय फॅन्ससाठी हिंदी आणि दक्षिण भारतीय गाण्यांवर डान्स करताना दिसून आला. भारतात टिक टॉक या अ‍ॅपवर बॅन घातल्यानंतर अश्विनने ट्विटरवर वॉर्नरची फिल्मी स्टाईलने मस्करी केली. वॉर्नरला टॅग करत त्याने लिहिले, “अप्पो अनवर… डेव्हिड वॉर्नर!” सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांच्या १९९५ साली आलेल्या ‘माणिक भाषा’ या चित्रपटातला हा प्रसिद्ध डायलॉग आहे. त्याच पद्धतीने, “(टिक टॉकबंदीनंतर) आता डेविड वॉर्नर काय करणार?”, असे अश्विनने वॉर्नरला उद्देशून विचारलं.

टिक टॉक बंदीवरून अश्विनने घेतली वॉर्नरची फिरकी, म्हणाला…

वॉर्नरची मस्करी एका चाहत्याला मात्र अजिबात रूचली नाही. त्याने अश्विनच्या संस्कारांवरूनच प्रश्न विचारला. तुला लहानाचा मोठा करताना तुझ्यावर योग्य संस्कार करण्यात आले नाहीत, अशी टीका त्या चाहत्याने केली. त्याच्यावर अश्विनने त्याला शांतपणे स्पष्टीकरण दिले. “मित्रा, वॉर्नरची मस्करी हा मजेचा भाग होता. भाषेच्या समस्येमुळे कदाचित तुला माझं म्हणणं कळलं नसेल. वॉर्नरचा चाहता असल्याने तू माझ्यावर टीका केलीस, पण मीदेखील वॉर्नरचा तुझ्याइतकाच मोठा चाहता आहे”, असे अश्विनने स्पष्ट केलं.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नरचे टिक टॅक व्हिडिओ भारतात खूपच प्रसिद्ध आहेत.