आंतरराष्ट्रीय पंच स्टिव्ह बकनर हे आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात सतत वादग्रस्त निर्णय देण्यासाठी परिचीत होते. सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचा राग अजुनही क्रिकेट प्रेमींच्या मनात कायम आहे. एकेकाळी अचूक निर्णयासाठी आयसीसीचे सर्वोत्तम पंच म्हणून ओळख असलेल्या बकनर यांची आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यातली कामगिरी फारशी चांगली नव्हती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून निवृत्ती स्विकारल्यानंतर, बकनर यांनी सचिनला दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचं मान्य केलं. ते Mason and Guests या रेडीओ कार्यक्रमात बोलत होते.

“सचिनला मी दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचं मला आठवतंय. कोणत्याही पंचासाठी चुकीचे निर्णय देणं ही चांगली बाब नाही, आयुष्यभर त्याला ही गोष्ट सहन करावी लागते, पण चुका या माणसाकडूनच होतात. ऑस्ट्रेलियात असताना एकदा मी सचिनला LBW बाद ठरवलं होतं. पण त्यावेळी बॉल वरुन जात होता…दुसऱ्या वेळी भारतात खेळत असताना मी सचिनला झेलबाद दिलं होतं. पण त्यावेळेसही चेंडू बॅटला लागलेला नव्हता. इडन गार्डन्सवर सामना असेल आणि भारतीय संघ बॅटींग करत असेल तर लाखभर प्रेक्षकांच्या आवाजात तुम्हाला काहीही ऐकू येत नाही. या चुकांबद्दल मलाही खेद आहे. मी माणूस आहे, चुका करणं हा प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे..आणि त्या चुका मान्यही करता यायला हव्यात.” बकनर सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याबद्दल बोलत होते.

निवृत्तीनंतर स्टिव्ह बकनर न्यू-यॉर्कमध्ये स्थायिक झाले आहेत. सचिन आणि स्टिव्ह बकनर यांच्यातील कथित द्वंद्वावर आयसीसीनेही २०१९ साली एक गमतीशीर ट्विट केलं होतं.

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. यामधून होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामने सुरु करण्याच्या तयारीत आहे.