भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शिखर धवनने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला. मात्र पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर उसळता चेंडू शिखरच्या अंगठ्याला लागल्यामुळे शिखरला संघाबाहेर जावं लागलं. १०-१२ दिवसात शिखर दुखापतीमधून सावरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती, मात्र तसं न झाल्यामुळे बीसीसीआयने ऋषभ पंतला शिखर धवनच्या जागी संघात स्थान दिलं आहे.

शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका आश्वासक पद्धतीने पार पाडली आहे. मात्र धवनची अनुपस्थिती आपल्यासाठी दुर्दैवी असल्याची भावना भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केली आहे. “शिखर धवनचं विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर जाणं हे दुर्दैवी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने केलेली खेळी विलक्षण होती. आमचा संघ सर्वोत्तम आहे, आणि आम्हाला सध्या कशाचीही चिंता नाहीये. झालेला प्रकार दुर्दैवी असला तरीही आम्हाला पुढचा विचार करणं भाग आहे.” बुमराह पत्रकार परिषदेत बोलत होता.

अवश्य वाचा – तू नक्की पुनरागमन करशील, मला विश्वास आहे! मोदींनी दिला धवनला धीर

दरम्यान शिखरनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. सचिन तेंडुलकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिखरचं सांत्वन करत त्याच्या लढाऊ बाण्याचं कौतुक केलं आहे. भारतीय संघाचा पुढचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे.