टी-२० मालिका २-१ च्या फरकानंतर जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पहिल्या वन-डे सामन्यातही इंग्लंडवर मात केली. ८ गडी राखून हा सामना जिंकत भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. रोहित शर्माची नाबाद शतकी खेळी, त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ आणि कुलदीप यादवचे ६ बळी ही भारताच्या विजयाची वैशिष्ट्य ठरली आहेत. या सामन्यात भारती खेळाडूंकडून अनेक विक्रम रचण्यात आले.

० – पहिल्या वन-डे सामन्यातला विजय हा विराट कोहलीचा कर्णधार या नात्याने ३९ वा विजय ठरला. कर्णधार या नात्याने पहिल्या ५० सामन्यानंतर एकाही खेळाडूला कोहलीएवढे सामने जिंकता आलेले नाहीयेत. कोहलीने पहिल्या सामन्यातील विजयासह क्लाईव्ह लॉईड आणि रिकी पाँटींग यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

१ – सलग ७ वन-डे मालिकांमध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी २०११-२०१२ सालात विराट कोहलीने सलग ६ शतकं झळकावली होती.

१ – कुलदीपने पहिल्या सामन्यात २५ धावा देऊन ६ बळी घेतले. कोणत्याही डावखुऱ्या फिरकीपटूला वन-डे सामन्यांमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाहीये. याचसोबत इंग्लंडमध्ये वन-डे सामन्यातलही ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. (फिरकीपटूंसाठी)

२ – कुलदीपने पहिल्या वन-डे सामन्यात इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. (जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो दोघेही ३५ चेंडूत ३८ धावा करुन माघारी परतले) एकाच गोलंदाजाने दोन्ही सलामीवीरांना एकाच धावसंख्येवर बाद करण्याची वन-डे क्रिकेटमधली दुसरी वेळ ठरली. याआधी २००६ साली फिडेल एडवर्डने झिम्बाब्वेच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं होतं.

३ – सलग नवव्या वर्षात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये १ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. याआधी केवळ ३ भारतीय फलंदाजांना हा करिष्मा साधता आला आहे. यामध्ये सचिन तेंडूलकर १६ वेळा, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी ११ वेळा तर सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांनी ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. कोहलीने पहिल्या सामन्यात गांगुली आणि सेहवागच्या कामगिरीशी बरोबरी केली.

३ – कुलदीप यादवचा अपवाद वगळता केवळ ३ गोलंदाजांना भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करता आलेली आहे. या यादीमध्ये स्टुअर्ट बिन्नी हा अवघ्या ४ धावात ६ बळी घेऊन पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर अनिल कुंबळे आणि आशिष नेहरा यांनी कुलदीपपेक्षा सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे.

३ – इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांना सामन्यात एकही विकेट न मिळू शकण्याची ही तिसरी वेळ ठरली.

४ – इंग्लंडमध्ये वन-डे सामन्यात गोलंदाजीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा कुलदीप चौथा गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानच्या वकार युनूसची ७/३६ ही कामगिरी या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे.

६/२७ – भारताकडून डावखुरा फिरकीपटू मुरली कार्तिकने मुंबईत २००७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ६ बळी घेतले होते. कुलदीपने पहिल्या सामन्यात ६/२५ अशी कामगिरी करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

११ – रोहित शर्माने वन-डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ११ वेळा १२५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रोहितने यासोबत विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने आतापर्यंत १९ वेळा अशी कामगिरी केली आहे.

१४ – वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावावर १४ शतकी भागीदाऱ्यांची नोंद आहे. भारतीय जोड्यांमध्ये सचिन तेंडुलकर/सौरव गांगुली (२६ वेळा) ही जोडी सर्वात पुढे आहे.

४५ – जुन २०१७ साली कुलदीप यादवच्या आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर एकाही गोलंदाजाला कुलदीप इतके बळी घेता आलेले नाहीयेत. कुलदीपने २१ सामन्यांमध्ये ४५ बळी घेतले आहेत.