भारतीय संघाने बुधवारी बेंगळुरू येथील अंतिम ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. मात्र, या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला त्याच्या फलंदाजीतील अपयशावरून छेडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विराटने या पत्रकाराला खणखणीत प्रत्युत्तर दिले. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला सुरूवात झाल्यापासून विराट कोहली हा सलामीला फलंदाजीला येत आहे. मात्र, या संपूर्ण मालिकेत सलामीवीर म्हणून विराट कोहली फारशा धावा करू शकला नाही. विराटने तीन सामन्यांत मिळून फक्त ५२ धावाच केल्या आहेत. याच मुद्द्यावरून एका पत्रकाराने विराटला त्याच्या अपयशाचे कारण विचारले. तेव्हा विराट म्हणाला की, मी आयपीएलमध्ये खेळताना सलामीलाच येऊन फलंदाजी केली होती. चार शतके झळकावली होती. त्यावेळी मी फॉर्ममध्ये असल्याने कुणीही काहीच बोलले नाही. मात्र, आता दोन सामन्यांमध्ये माझ्याकडून अपेक्षित धावा झाल्या नाहीत, तर ते लगेच दिसले. मी चांगल्या धावा करत होतो तेव्हा माझे भरभरून कौतूक केले जात होते. मात्र, गेल्या दोन सामन्यांमध्ये मी चांगल्या धावा करू शकलो नाही. माझे लक्ष अन्य गोष्टींकडेही वळाले आहे. संघात माझ्याशिवाय दहा खेळाडू असतात. तेव्हा मीच सगळे केले तर इतरजण काय करणार, असा प्रतिसवाल विराटने यावेळी विचारला. मी या मालिकेत मिळालेल्या विजयाबद्दल आनंदी आहे व सलामीवीर म्हणून आलेल्या अपयशाची मला चिंता नाही. मी जर या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असती तर तुम्ही हा प्रश्न मला विचारला असतात का? हे बरोबर नाही. त्यामुळे भारताच्या विजयाचा आनंद साजरा करा, आम्ही चांगल्याप्रकारे खेळलो, असेही विराटने सांगितले.

भारताने बुधवारी तिसऱ्या ट्वेन्टी-२० इंग्लंडला धूळ चारली. सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनीच्या फटकेबाजीनंतर युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ७५ धावांनी मात केली. चहलने सहा बळी टिपले. इंग्लंडचे अखेरचे आठ फलंदाज ८ धावांत माघारी परतले. या विजयासह टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ४-०, एकदिवसीय मालिका २-१ आणि पाठोपाठ टी-२० मालिका २-१ अशी जिंकून निर्भेळ यश मिळवले आहे.