‘आयसीसी’ कसोटी क्रमवारीत भारताचे वर्चस्व; पंत, बुमरा यांची आगेकूच

दुबई : ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर प्रथमच ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाला गवसणी घालणारा भारतीय संघ व कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सोमवारी जाहीर झालेल्या नव्या क्रमवारीत अग्रस्थान कायम राखले आहे. तर ऋषभ पंत व जसप्रीत बुमरा यांनीदेखील अनुक्रमे फलंदाज व गोलंदाजांच्या क्रमवारीत आगेकूच केली आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली ९२२ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान असून न्यूझीलंडचा केन विल्यम्सन ८९७ गुणांनिशी दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावणारा चेतेश्वर पुजारा (८८१) तिसऱ्या स्थानी कायम आहे. तर यष्टिरक्षक पंतने प्रथमच अव्वल २० खेळाडूंत झेप घेत १७वे स्थान मिळवले आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडाने त्याचे वर्चस्व कायम राखले असून तो ८८२ गुणांसह इंग्लंडच्या जेम्स अँडरसनपेक्षा (८७४) आठ गुणांनी पुढे आहे. भारताचे रवींद्र जडेजा रविचंद्रन अश्विन अनुक्रमे पाचव्या व नवव्या स्थानी आहेत. तर वेगवान गोलंदाज बुमराने ७११ गुणांसह १५वा क्रमांक मिळवला आहे.

सांघिक क्रमवारीत भारत ११६ गुणांसह प्रथम क्रमांकावर विराजमान असून दक्षिण आफ्रिका (११०) दुसऱ्या स्थानी आहे. तर बुधवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले तरीही तिसऱ्या क्रमांकावरील इंग्लंड १०८ गुणांपर्यंतच पोहचू शकणार आहे. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया-श्रीलंका यांच्यातील मालिकेच्या निकालाचादेखील क्रमवारीवर काहीच परिणाम होणार नाही.