पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या विश्वनाथन आनंदने ११ व्या फेरीत रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकशी बरोबरी पत्करत आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेचे जेतपद पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली. स्पर्धेच्या तीन फेऱ्या शिल्लक असून आनंदने अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनला एका गुणाने मागे टाकून अव्वल स्थान कायम राखले आहे. आनंदला पराभवाला सामोरे जावे लागले नाही तर त्याचे जेतेपद निश्चित होणार आहे. आनंदने जेतेपद पटकावल्यास त्याला वर्षअखेरीस होणाऱ्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनशी लढण्याची संधी मिळेल.
बुधवारचा दिवस निराशाजनक ठरला. स्पर्धेतील चारही लढती बरोबरीत सुटल्या. रशियाच्या पीटर स्विडलरने अरोनियनविरुद्ध बरोबरी पत्करली. रशियाच्या दिमित्री आंद्रेकीनने अझरबैजानच्या शाख्रीयार मामेद्यारोव्हविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. रशियाचा सर्जी कार्याकिन आणि बल्गेरियाचा व्हेसेलिन टोपालोव्ह यांनीही बरोबरीतच धन्यता मानली. आनंद ७ गुणांसह अव्वल स्थानी असून अरोनियन ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कार्याकिन, मामेद्यारोव्ह आणि स्विडलर यांनी प्रत्येकी ५.५ गुणांसह संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले आहे. क्रॅमनिक आणि आंद्रेकीन प्रत्येकी ५ गुणांसह संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहेत. टोपालोव्हने ४.५ गुणांसह आठवे स्थान प्राप्त केले आहे.
क्रॅमनिकने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना कॅटलन पद्धतीनुसार डावाची सुरुवात केली. गेले दोन सामने गमावल्याचे दडपण क्रॅमनिकच्या खेळावर जाणवत होते. आनंद बचावात्मक पद्धतीने क्रॅमनिकच्या हल्ल्यांना उत्तर देत होता. आनंद एका प्यादाने पिछाडीवर पडला होता. पण क्रॅमनिकला त्याचा फायदा उठवता आला नाही. अखेर ३१ चालींनंतर दोघांनीही बरोबरी पत्करण्याचे मान्य केले.
११ व्या फेरीतील निकाल
विश्वनाथन आनंद बरोबरी वि. व्लादिमिर क्रॅमनिक,
पीटर स्विडलर बरोबरी वि. लेव्हॉन अरोनियन,
दिमित्री आंद्रेकीन बरोबरी वि. शाख्रीयार मामेद्यारोव्ह,
सर्जी कार्याकिन बरोबरी वि. व्हेसेलिन टोपालोव्ह
गुणतालिका
बुद्धिबळपटू     गुण
विश्वनाथन आनंद    ७
लेव्हॉन अरोनियन    ६
शाख्रीयार मामेद्यारोव्ह ५.५
सर्जी कार्याकिन    ५.५
पीटर स्विडलर    ५.५
व्लादिमिर क्रॅमनिक    ५
दिमित्री आंद्रेकीन      ५
व्हेसेलिन टोपालोव्ह    ४.५