महेंद्र सिंग धोनीला टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मेंटॉर बनवण्यात आल्याने त्याचे चाहते आणि दिग्गज दोघांनीही याबद्दल आनंद व्यक्त केलाय. मात्र भारताचा माजी फलंदाज अजय जडेजाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले. जडेजाने धोनीला मेंटॉर बनवण्याचा निर्णय समजला नसल्याचं म्हटलं आहे. आपल्याला या निर्णयामागे काय तर्क वापरण्यात आलाय हे समजलं नसल्याचं जडेजाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Eng Test Cancelled: “त्या गुन्ह्यासाठी रवी शास्त्री आणि कोहलीला अटक करा”; संतप्त भारतीयांची मागणी

सोनी स्पोर्ट्ससोबत बोलताना जडेजाने या निर्णयाबद्दल शंका उपस्थित केलीय. मी मागील दोन दिवसांपासून कोणत्या विचाराने हा निर्णय घेण्यात आला असेल याचा विचार करतोय. धोनीचं खेळाबद्दलचं न्याय आणि विचार करायची पद्धत तो संघात नसताना कशी कामी येईल हे मला अद्याप न उलगडलेलं कोडं आहे. मला याबद्दल बोलायचं नाहीय. रविंद्र जडेजाला अजिंक्य रहाणेच्याआधी फलंदाजीला पाठवण्यासारखा हा प्रकार असून नक्की हे का केलं हे त्या खेळाडूंना कळत नाही आणि त्यांचा गोंधळ होतो, असाच हा प्रकार असल्याचं जडेजा म्हणालाय.

नक्की वाचा >> T20 World Cup: धोनीच्या निवडीनंतर दुसऱ्याच दिवशी वादाला सुरुवात; BCCI कडे धोनीविरोधात लेखी तक्रार

भारताच्या या माजी क्रिकेटपटूने पुढे बोलताना आपल्याला हा निर्णय फारच अनाकलनिय वाटल्याचं म्हटलं आहे. माझ्या इतका मोठा एम. एस. धोनीचा इतर कोणाताही चाहता नसेल. माझ्यामध्ये धोनी हा असा कर्णधार आहे ज्याने आपलं पद सोडण्याआधी पुढील कर्णधार आपल्या नेतृत्वाखालीच तयार केला होता. विराट कोहली धोनीच्या नेतृत्वाखाली दोन वर्षाहूनही अधिक काळ मर्याजदित षटकांचे क्रिकेट खेळत होता.

विराट कोहलीचं नेतृत्व आणि रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळेच मला वाटतं की टी २० विश्वचषकासाठी कोणत्याही मेंटॉरीच गरज नव्हती. तुम्ही एक कर्णधार निवडला आहे आणि तो स्वत:च्या जोरावर संघाला पुढील टप्प्यावर घेऊन गेलाय. तसेच एक प्रशिक्षक ज्याने भारतीय संघाला (कसोटीमध्ये) जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ बनवलं आहे. असं सार असतानाच अचानक एका रात्रीत भारतीय संघाला एका मेंटॉरची गरज का पडली?, ही गोष्ट मला थोडं हैराण करणारी आहे, असं जडेजाने यावेळी बोलताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “IPL साठी विराट असं करणं शक्यच नाही”; सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डावर संतापले भारतीय चाहते

सध्या भारतीय क्रिकेट हे अगदीच वेगळ्या पद्धतीने सुरु आहे. धोनी वेगळ्या पद्धतीने नेतृत्व करायचा. तो फिरकी गोलंदाजांना संधी द्यायचा. तो कधीच चार जलदगती गोलंदाजांना संघात घेऊन सामना खेळला नाही. तर नुकताच इंग्लंडमध्ये चार जलद गती गोलंदाजांचा वापर करण्यात आला. ही बदललेली विचारसणी आहे. एका व्यक्तीचा विचार हा दुसऱ्या व्यक्तीपेक्षा फार वेगला असतो. इथे दोन्ही विचार एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातोय. असं मत जडेजाने व्यक्त केलंय.

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने १९ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आयसीसी टी २० वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करताना त्यामध्ये महेंद्र सिंग धोनीकडे मेंटॉरपदाची जबाबदारी दिलीय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मात्र धोनीला पुन्हा संघासोबत पाठवण्याचा निर्णयावर काहींनी प्रश्न उपस्थित करताना याची काही गरज होती का असं म्हटलं आहे. त्यामध्ये आता जडेजाचाही समावेश झालाय.