ओष्ठव्यंगत्व या व्याधीवर ‘स्माइल ट्रेन’ संस्थेच्या मदतीद्वारे मात करणाऱ्या भारताच्या पिंकी सोनकरच्या हस्ते विम्बल्डनच्या पुरुष गटाच्या अंतिम लढतीची नाणेफेक करण्यात आली. विम्बल्डनच्या परंपरेला साजेसा अशा पांढऱ्या पेहरावात पिंकीचे सेंटर कोर्टवर आगमन झाले. तिने प्रेक्षकांना अभिवादन केले. सामनाधिकाऱ्यांसह अंतिम लढतीत खेळणारे खेळाडू अँडी मरे आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्याशी पिंकीने हस्तांदोलन केले. यानंतर पिंकीच्या हस्ते नाणेफेक करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर तालुक्यातील छोटय़ा गावची रहिवासी असलेल्या पिंकीला ओष्ठव्यंगत्व हा आजार होता. न्यूयॉर्कमधील ‘स्माइल ट्रेन’ या संस्थेने पिंकीवरील शस्त्रक्रियेची जबाबदारी उचलली. ओष्ठव्यंगत्व या आजारावर उपचार उपलब्ध करून देणारी ‘स्माइल ट्रेन’ जगभरातील सर्वात मोठी संस्था आहे. ‘स्माइल ट्रेन’ विम्बल्डन स्पर्धेची धर्मादाय सहयोगी संस्था आहे. याअंतर्गतच पिंकीला विम्बल्डन वारीची संधी मिळाली. लंडनमधील वास्तव्यादरम्यान पिंकी ‘स्माइल ट्रेन’ संस्थेच्या मदतीने ओष्ठव्यंगत्वावर मात केलेल्या अन्य देशांतील व्यक्तींना भेटणार आहे.