भारताचा सिक्सर किंग 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 च्या क्रिकेट विश्वचषकाचा नायक युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय व प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीची घोषणा करताना युवराज भावुक झाला होता.

क्रिकेटची कारकीर्द आज संपुष्टात आली, हे सांगताना युवराज भावुक झाला होता. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांचे आभारही मानले. “प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा क्षण येतो की, आता थांबवं. आई-वडिलांशी चर्चा करुनच निवृत्तीचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला होता,” असं युवराजने यावेळी सांगितलं. निवृत्तीनंतर कॅन्सरग्रस्तांसाठीचं काम सुरुच ठेवणार असल्याचं युवराज म्हणाला. आक्रमक खेळ करणाऱ्या या  खेळाडूला कॅन्सरनेही ग्रासलं होतं. मात्र क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूने कॅन्सरशीही यशस्वी लढा देऊन यशस्वी कमबॅक केलं.

निवृत्तीची घोषणा करताना युवराजने पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना अगदी मनमुरादपणे उत्तरं दिली. यावेळी, युवराजला तुला कोणत्या गोष्टीची खंत आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर  निवृत्ती घेतल्यानंतर आयुष्यात एका गोष्टीची खंत नेहमी राहणार असल्याचे युवीनं सांगितले. तो म्हणाला,” 17 वर्षांच्या कारकिर्दीत जास्त कसोटी सामने खेळता न आल्याची खंत नेहमी राहील. आजारपणामुळे कसोटी खेळता आली नव्हती आणि ते माझ्या हातात नव्हतं.”

युवराजला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत केवळ 40 कसोटी सामन्यांमध्ये देशातं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, आणि याचीच खंत असल्याचं युवराजने स्पष्ट केलं.  युवीने 40 कसोटी सामन्यांत 33.92 च्या सरासरीनं 1900 धावा केल्यात, त्यात तीन शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.  वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 304 सामने आहेत. त्यात त्याने 36.55च्या सरासरीनं 8701 धावा आणि 111 विकेट्सही आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 58 सामन्यांत 1177 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत.