विश्षचषक स्पर्धेतला बांगलादेश विरोधातला सामना भारताने २८ धावांनी जिंकला. या सामन्याची चर्चा जेवढी रंगली होती, तेवढीच चर्चा मैदानात बसून टीम इंडियाला चिअर करणाऱ्या आणि पिपाणी वाजवणाऱ्या आजींचीही होती. या आजींचं नाव चारूलता पटेल असे आहे. भारताने हा सामना जिंकावा म्हणून मी बाप्पाची प्रार्थना करत होते असं या आजींनी म्हटलं आहे. या आजींचा उत्साह पाहून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीही त्यांना भेटला आणि त्यांचे आभार मानले.

मैदानात जेव्हा जेव्हा टीम इंडियाचे खेळाडू चौकार मारत किंवा चांगली कामगिरी करत तेव्हा या आजी हातातील पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या. शतकवीर रोहित शर्मानेही या आजींची भेट घेतली. टीम इंडियाची कामगिरी आपल्याला कायमच आवडते. भारतच जिंकावा यासाठी मी गणपतीची प्रार्थना करत होते. भारत जिंकेल अशी खात्री आहे असं त्यांनी म्हटलं होतं. एएनआयलाही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भारत विश्वचषक जिंकेल अशी मला खात्री आहे असंही चारूलता पटेल आजी म्हटल्या आहेत.

सोशल मीडियावरही या आजींचीच चर्चा रंगली आहे. त्या अत्यंत उत्साहात सामना पहात होत्या. त्यांचा हा उत्साह पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि शतकवीर रोहित शर्मा या दोघांनीही या आजींची भेट घेतली. तुम्ही चांगली कामगिरी करा असा आशीर्वाद या आजींनी या दोघांनाही दिला.