ग्वाल्हेर : २०२१-२२ रणजी करंडक विजेता मध्यप्रदेश बुधवारपासून सुरू होणाऱ्या इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत शेष भारत संघाचा सामना करेल. शेष भारत संघाचा कर्णधार मयांक अगरवालला निवड समितीचे लक्ष नव्याने वेधून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.या सामन्याचा सर्वाधिक फायदा करून घेण्याची संधी मयांकला असेल. राष्ट्रीय संघात राहुल अपयशी ठरत असताना निवड समिती निश्चितपणे मयांकच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून असणार यात शंका नाही. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविद्धच्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर मयांकने भारतीय संघातील स्थान गमावले होते. खेळाडूंना पुनरागमन आणि भारताची दुसरी फळी निश्चित करण्याच्या दृष्टीने या सामन्याला महत्त्व असेल.यंदाच्या रणजी हंगामात मयांकने फलंदाजीतील सातत्य दाखवून दिले आहे. या हंगामात मयांकने ९९० धावा केल्या आहेत. आता इराणी चषक स्पर्धेत शेष भारताचे नेतृत्व करताना त्याला आपली लय दाखवता येणार आहे.
मधल्या फळीत रजत पाटीदार आणि कर्णधार आदित्य श्रीवास्तव खेळत नसल्याने इराणी चषकाच्या अंतिम लढतीत मध्य प्रदेशाची बाजू निश्चितच दुबळी ठरणार आहे. वेगवान गोलंदाज आवेश खान, अष्टपैलू वेंकटेश अय्यर, डावखुरा फलंदाज कुमार कार्तिकेय आणि यश दुबे यांच्यावर मध्य प्रदेशाला अवलंबून राहावे लागणार आहे. तुलनेत शेष भारत संघाची सलामीची मयांक आणि अभिमन्यू जोडी कमालीच्या लयीमध्ये असल्यामुळे मध्य प्रदेशाच्या गोलंदाजांना सुरुवातीपासून अचूक मारा करावा लागेल. मयांक मरकडे जायबंदी झाल्याने शम्स मुलानीला संघात स्थान मिळाले आहे.
वेळ : सकाळी ९.३० वा.