डावखुरा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला तब्बल दोन वर्षानंतर संघात स्थान मिळालं आहे. चेन्नई येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीपला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. दोन वर्षांपासून कुलदीप यादव भारतीय संघासोबत आहे. मात्र, अंतिम ११ मध्ये स्थान मिळालं नव्हतं. यावरुन अनेक क्रीडा तज्ज्ञा आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर टीकास्त्रसह सोडलं होतं. अखेर, आज इंग्लंडविरोधात कुलदीपला संघात स्थान देण्यात आलं आहे.

कुलदीप यादव यानं मार्च २०१७ मध्ये धर्मशाळा येथे ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आजतागत कुलदीप फक्त सहा कसोटी सामने खेळला आहे. कुलदीपनं अखेरचा कसोटी सामना जानेवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळला होता. चार वर्षांमध्ये कुलदीप यादवनं सहा कसोटी सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

आणखी वाचा- IND vs ENG : कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण…. – पीटरसन

सहा कसोटी सामन्यात कुलदीप यादव यानं २४.१२ च्या सरासरीनं २४ बळी घेतले आहेत. यामध्ये ५ बळी दोन वेळा आणि ४ बळी दोनदा घेण्याची किमया त्यानं साधली आहे. ५७ धावा देत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. अशा प्रतिभावंत गोलंदाजाला दोन वर्षांपासून अंतिम ११ मध्ये स्थान मिळालं नाही.

फलंदाजी ठरतेय कमकुवत बाजू –
विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांना डाव्या हाताच्या असा गोलंदाज हवाय जो वेळप्रसंगी फलंदाजीही करु शकतो. त्यामुळेच कुलदीप यादव याच्याऐवजी वॉशिंगटन सुंदर आणि शाबाज नदीम यांना संघात स्थान मिळालं. रविंद्र जाडेजाच्या अनुपस्थिती डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू संघातील संतुलन कायम राखू शकतो. कुलदीप यादवची फलंदाजीची बाजू कमकुवत असल्यामुळे संघात स्थान मिळणं कठीण गेलं.