वृत्तसंस्था, अहमदाबाद
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकल्याच्या सातच महिन्यांनी रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदापासून दूर करण्याचा अनपेक्षित निर्णय अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतला. मात्र, भविष्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण आगरकर यांनी दिले आहे. तीन प्रारूपांसाठी तीन वेगळे कर्णधार असणे अडचणीचे ठरते. प्रत्येक कर्णधाराचे विचार आणि योजना वेगळ्या असतात. त्यामुळे संघबांधणी करणे अवघड जाऊ शकते, असेही आगरकर पुढे म्हणाले.

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अपेक्षित संघनिवड करण्यात आली. मात्र, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी काही अनपेक्षित निर्णय घेण्यात आले. रोहित आणि विराट कोहली यांचे एकदिवसीय संघातील स्थान कायम राहिले, पण नेतृत्वाची जबाबदारी रोहितऐवजी शुभमन गिलकडे सोपविण्यात आली. तसेच रवींद्र जडेजाला संघातून वगळण्यात आले आणि जसप्रीत बुमरालाही विश्रांती देण्यात आली. जायबंदी हार्दिक पंड्या दोन्ही मालिकांना मुकणार आहे.

एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून रोहितने ५६ पैकी ४२ सामने जिंकले. मात्र, दोन वर्षांनी आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळी रोहित ४० वर्षांचा असेल. त्यातच तो ट्वेन्टी-२० व कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने त्याला तंदुरुस्ती टिकवणे आणि कामगिरीत सातत्य राखणेही अवघड जाऊ शकेल. हेच लक्षात घेत निवड समितीने हा निर्णय घेतल्याचे समजते. गिल आता कसोटी आणि एकदिवसीय या दोन प्रारूपांत भारताचे नेतृत्व करेल. तर ट्वेन्टी-२० संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडेच कायम आहे.

‘‘तीन प्रारूपांत तीन वेगळे कर्णधार असणे संघबांधणीच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते. आम्हाला कधीतरी पुढील एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात करावीच लागणार होती. या प्रारूपात भारतीय संघ सर्वांत कमी सामने खेळतो. त्यामुळे नव्या कर्णधाराला आपल्या योजना राबविण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा अशी आमची धारणा आहे,’’ असे आगरकर म्हणाले.

‘‘पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दोन वर्षांनी होणार आहे. त्यामुळे स्पर्धेच्या तयारीसाठी खूप वेळ आहे असे वाटू शकते. मात्र, प्रत्यक्षात आम्ही विश्वचषकापूर्वी आणखी किती सामने खेळणार हे आम्हालाही ठाऊक नाही. आम्ही अखेरचा एकदिवसीय सामना चॅम्पियन्स करंडकात मार्चमध्ये खेळलो होतो. आमचा पुढील सामना १९ ऑक्टोबरला आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघबांधणी करणे हे सध्या मोठे आव्हान ठरत आहे,’’ असेही आगरकर यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामने ३८ वर्षीय रोहित आणि ३६ वर्षीय विराट यांच्यासाठी अखेरचे ठरू शकतील का, असे विचारले असता, ‘मला याबाबत काहीही माहिती नाही’ असे आगरकर म्हणाले. ‘‘रोहित आणि विराट तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची निवड केली आहे. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

रोहितने चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली नसती, तरी त्याला कर्णधारपदापासून दूर करणे अवघडच गेले असते. कर्णधार म्हणून रोहितने फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र, कधीतरी तुम्हाला भविष्याचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागतात. तुम्हाला खेळाडूला नाही, तर संघहिताला प्राधान्य द्यावे लागते. जे निर्णय सहा महिन्यांनी घेतले जाऊ शकतात, ते आताच घेतलेले कधीही चांगले. – अजित आगरकर, अध्यक्ष, निवड समिती.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ

एकदिवसीय : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल.
ट्वेन्टी-२० : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

दौऱ्याचा कार्यक्रम

एकदिवसीय मालिका : पहिला सामना (पर्थ, १९ ऑक्टोबर), दुसरा सामना (ॲडलेड, २३ ऑक्टोबर), तिसरा सामना (सिडनी, २५ ऑक्टोबर)
ट्वेन्टी-२० मालिका : पहिला सामना (२९ ऑक्टोबर, कॅनबेरा), दुसरा सामना (३१ ऑक्टोबर, मेलबर्न), तिसरा सामना (२ नोव्हेंबर, होबार्ट), चौथा सामना (६ नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट), पाचवा सामना (८ नोव्हेंबर, ब्रिस्बेन)