टीम इंडियाचा मधल्या फळीतला सर्वात भरवशाचा फलंदाज अंबाती रायुडूने बुधवारी दुपारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विश्वचषक संघात सलग दोनवेळा संधी नाकारण्यात आल्यामुळे रायुडूने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. विश्वचषकासाठी १५ जणांचा संघ जाहीर करताना बीसीसीआयच्या निवड समितीने रायुडूला डावलत विजय शंकरला पसंती दिली. यानंतर विजय शंकर दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतरही रायुडूला डावलत मयांक अग्रवालसारख्या तुलनेने नवख्या खेळाडूला संधी दिली.
अवश्य वाचा – BLOG : अंबाती रायुडू, टीम इंडियाचा शापित गंधर्व !
यानंतर रायुडूने बीसीसीआयला पत्र लिहीत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं म्हटलं आहे. जाणून घेऊयात काय म्हणाला रायुडू बीसीसीआयला लिहीलेल्या पत्रात….
माननीय महोदय,
मी ही गोष्ट आपणास कळवू इच्छितो की मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत मला खेळण्याची संधी दिल्याबद्दल बीसीसीआय आणि हैदराबाद, बडोदा, आंध्र प्रदेश आणि विदर्भ या सर्व संघटनांचा मी आभारी आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघाचाही मी आभारी आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तीन कर्णधारांच्या हाताखाली मला खेळायला मिळालं, त्यांचाही मी ऋणी आहे. विराट कोहलीने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीच विसरणार नाही. प्रत्येकवेळी क्रिकेटमधून मला काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली. जाता जाता, या संपूर्ण काळात माझ्या पाठीमागे उभ्या राहणारा माझा परिवार आणि चाहत्यांचाही मी आभारी आहे. धन्यवाद,
आपला विनम्र,
अंबाती रायुडू