वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या (बीएफआय) निवडणुकीतील संघर्ष मिटण्याची चिन्हे नाहीत. हिमाचल प्रदेशकडून अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेल्या माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना पुन्हा एकदा ‘बीएफआय’च्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी नियुक्त असलेल्या हंगामी समितीने २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी बुधवारी जाहीर केलेल्या ६६ जणांच्या निवडणूक मंडळातून अनुराग ठाकूर यांचे नाव वगळण्यात आले आहे.

लोकशाही पद्धतीनेच झालेल्या निवडणूक संघटनेवर निवडून आलेल्या व्यक्तीलाच ‘बीएफआय’ची निवडणूक लढवता येणार असल्याचे सुधारित घटनेत नमूद करण्यात आले आहे. यानंतरही हिमाचल प्रदेश संघटनेने घोषित प्रतिनिधी असलेल्या अनुराग ठाकूर यांचे नाव पुन्हा पुढे केले होते. ठाकूर यांच्या उमदेवारीमुळेच यापूर्वी एकदा ‘बीएफआय’ची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर जागतिक बॉक्सिंगकडून दैनंदिन कामकाजासाठी हंगामी समितीची स्थापना करण्यात आली आणि त्यांना ३१ ऑगस्टपूर्वी निवडणूक घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली होती.

हंगामी समितीने अनुराग ठाकूर यांच्याबरोबरीने घटनेनुसार दिल्ली संघटनेच्या जैनेंद्र जैन यांचेही नाव वगळले आहे. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेश संघटनेने यापूर्वीच घटनेतील सुधारित तरतुदीला न्यायालयात आव्हान दिले असून, प्रकरण नव्याने न्यायप्रविष्ट आहे.