पीटीआय, दुबई

IND vs PAK Match Live Update: भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यापूर्वी मैदानाबाहेर असलेला संघर्ष आता मैदानापर्यंत येऊन पोहोचला आहे. अशा तीव्र झालेल्या तणावग्रस्त वातावरणात भारतीय संघ फिरकी गोलंदाजांच्या जोरावर आणखी एक प्रभावी कामगिरी करण्यासाठी सज्ज असणार आहे.

‘अव्वल चार’ फेरीतील या सामन्यात भारत आणि पाकिस्तान खेळाडूंवर समान दडपण आहे. या वेळी मैदानावरील ताकदीपेक्षा मैदानाबाहेरील घटनांचे दडपण अधिक आहे. अशा तीव्र झालेल्या स्पर्धेत दोन्ही संघ मानसिकता कशी राखतात यावर सामन्यातील चुरस अवलंबून असेल.

साखळी सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार देण्याची भूमिका भारतीयांनी या दुसऱ्या सामन्यातही कायम ठेवल्यास आश्चर्य वाटणार नाही. अर्थात, हस्तांदोलन करणे अथवा न करणे याला महत्त्व नाही. पण, पाकिस्तानी खेळाडू आणि चाहते त्याला ते देत आहेत. द्वेषाच्या नजरेतूनच ते या सामन्याकडे बघत आहेत.

भारताने तीनही सामने सहज जिंकले आहेत. मात्र, हलक्याने घेतलेल्या ओमाविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या काही मर्यादा समोर आल्या हे विसरून चालणार नाही. महत्त्वाच्या वळणावर असलेल्या स्पर्धेत अन्य खेळाडूंची चाचपणी करण्याचा प्रयत्न भारताने ओमानविरुद्ध केला. पण, एक वेळ तो संघर्षापर्यंत जाऊन पोहोचला होता. भारताचे फलंदाज आव्हान उभे करण्यापर्यंत पोहोचले.

पण, गोलंदाजांना त्याचा बचाव करताना अडचण आली. ओमानच्या अमिर कलिम आणि हम्माद मिर्झा या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना जेरीस आणले. फिरकीसह भारतीय गोलंदाज या सामन्यात अचूक दिशा आणि टप्पा राखू शकले नाहीत हे सत्य आहे.

पायक्रॉफ्टच सामनाधिकारी

पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) वारंवार विनंती करूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज होणाऱ्या भारत- पाकिस्तान लढतीसाठी सामनाधिकारी म्हणून वादग्रस्त अँडी पायक्रॉफ्ट यांचीच नियुक्ती केली आहे. ‘आयसीसी’ने अधिकृतपणे सामनाधिकाऱ्याच्या नावाची घोषणा केली नसली, तरी एका वरिष्ठ सूत्राने ‘आयसीसी’ने सामनाधिकारी म्हणून पायक्रॉफ्ट यांची नियुक्ती केल्याचे सांगितले.

पाकिस्तान : फखर जमां, हसन नवाज, खुशदिल शाह, सैम अयूब, सलमान आघा (कर्णधार), हुसैन तलत, फहीम अशरफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद हारिस, साहिबजादा फरहान, अबरार अहमद, हारिस रौफ, हसन अली, सलमान मिर्जा, शाहीन शाह अफरीदी, सुफियान मुकीम, मोहम्मद वसीम जूनियर.

भारताची फिरकीवर मदार

●बुमरा आणि वरुण चक्रवर्ती यांची अनुपस्थिती भोवली अशी चर्चा होती. पाकिस्तानविरुद्ध हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा अंतिम अकरात येणार असल्यामुळे भारताची ताकद वाढणार आहे.

●खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत असल्यामुळे कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीवर भारताची पूर्ण मदार असेल.

● ओमानविरुद्ध झेल घेण्याच्या प्रयत्नांत अक्षरच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे चिंता वाढली होती. मात्र, भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी अक्षर तंदुरुस्त असल्याचा निर्वाळा दिला आहे.

●यानंतरही अक्षर तंदुरुस्त ठरला नाही, तर वॉशिंग्टन सुंदरचा पर्याय भारतासमोर असतील. अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शुभम दुबे, संजू सॅमसन अशी भारतीय फलंदाजी तगडी आहे हे सांगायला नको.

युवा फलंदाजांकडे लक्ष

●पाकिस्तान संघात या वेळी गुणवत्तेचा अभाव दिसून येत आहे. क्रिकेट खेळातील अनिश्चितता यावर अलीकडे पाकिस्तान संघ अवलंबून राहिला आहे.

●एकेकाळी तंत्रपूर्ण आणि आकर्षक असणारी पाकिस्तानची फलंदाजी आज निस्तेज वाटत आहे. मियांदाद, इंझमाम, सलिम मलिक, एजाझ अहमद, मुदस्सर नझर, शाहिद आफ्रिदी यांच्या जवळपासही पाकिस्तानची नवी पिढी पोहोचलेली दिसत नाही.

●सलामीचा फलंदाज सैम अयुब याच्यावर पाकिस्तानची मदार असल्याचे बोलले जात होते. मात्र, तो दोन सामन्यांत शून्यावर बाद झाला. त्याच्या फिरकीने प्रभावित केले आहे.

●अशा वेळी साहिबजादा फरहान आणि हसन नवाज यांच्यावर भार पडत आहे. विशेष म्हणजे यानंतरही वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीच सध्या सर्वोत्तम फलंदाज म्हणून समोर येत आहे.

●पाकिस्तानने या वेळी हॅरिस रौफला संधी देण्याचा विचार केल्यास आश्चर्य वाटणार नाही.

संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह.

पाकिस्तान : फखर जमां, हसन नवाज, खुशदिल शाह, सैम अयूब, सलमान आघा (कर्णधार), हुसैन तलत, फहीम अशरफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद हारिस, साहिबजादा फरहान, अबरार अहमद, हारिस रौफ, हसन अली, सलमान मिर्जा, शाहीन शाह अफरीदी, सुफियान मुकीम, मोहम्मद वसीम जूनियर.