राष्ट्रकूलमधील पदक विजेते अमित पानघल आणि दोन वेळचा आशियाई पदक विजेता विकास कृष्णन आणि धीरज यांनी प्रतिस्पर्ध्याना लोळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

सलग तिसऱ्या आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारा एकमेव बॉक्सर बनण्याची शक्यता असलेल्या विकास कृष्णनने सोमवारी पाकिस्तानी बॉक्सरला नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. विकासने यापूर्वी २०१० च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण तर २०१४ च्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. या स्पर्धेतदेखील त्याची कामगिरी प्रभावी ठरत आहे. सोमवारच्या लढतीत विकासने पाकिस्तानी बॉक्सर तन्वीर अहमदला ५-० असे पराभूत केले. विकासने लढतीच्या प्रारंभापासूनच तन्वीरवर दबाव राखत आघाडी घेतली. त्यानंतर त्याच्या डोळ्याच्या जवळ झालेली छोटीशी जखमदेखील त्याच्या विजयाच्या मार्गात अडथळा ठरू शकली नाही. हरयाणाच्या अमित पानघलने अखेरच्या टप्प्यात  मंगोलियाच्या खारहुविरुद्ध ठोशांची बरसात करून त्याला पराभूत केले. अमितचा पुढच्या लढतीत उत्तर कोरियाच्या किम जॅँग रयॉँग याच्याबरोबर सामना होणार आहे.

धीरजने किरगिझीस्तानच्या कोबाशेव नुरलान याच्यावर ३-० अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. मात्र, भारताच्या मोहम्मद हुसाम उद्दीन याला मंगोलियाच्या बॉक्सरने एक गुणाच्या फरकाने पराभूत केल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.

हॅट्ट्रिककडे वाटचाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकासने तन्वीरवर सहजपणे मात करत आशियाईतील तिसरे पदक मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. बुधवारी विकासचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना चीनच्या तुओहेटा एरबिके तंगलाटीहानशी होणार आहे. जर विकासने या सामन्यासह पदक जिंकले तर सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवत हॅट्ट्रिक साधणारा तो पहिला आणि एकमेव बॉक्सर ठरू शकणार आहे.