वृत्तसंस्था, सिडनी

बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट मालिकेला आता प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. आम्ही भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत असल्याचे विधान ऑस्ट्रेलियाचा तारांकित वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने केले.

तीन दशकांत प्रथमच बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत पाच सामने खेळवले जाणार आहेत. यंदा ऑस्ट्रेलियात या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. ‘‘पाच सामने खेळवण्याचा निर्णय झाल्याने आता या मालिकेला अॅशेसइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे,’’ असे स्टार्क म्हणाला.

हेही वाचा >>>PAK vs BAN Test: आऊट की नॉट आऊट? तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरून वाद, ड्रेसिंग रूममध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने काय केलं? पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाने २०१४-१५ च्या हंगामानंतर बॉर्डर-गावस्कर करंडक उंचावलेला नाही. भारताने सलग चार वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. यात २०१८-१९ आणि २०२०-२१ अशा ऑस्ट्रेलियातील दोन ऐतिहासिक मालिका विजयांचाही समावेश आहे.

‘‘ऑस्ट्रेलियात झालेल्या गेल्या दोन मालिकांमध्ये भारताने आम्हाला पराभूत केले. त्या पराभवांची परतफेड करण्यास आम्ही नक्कीच उत्सुक आहोत. मायदेशातील सर्व सामने जिंकणे हेच आमचे लक्ष्य असते. भारताचा संघ खूप मजबूत आहे. त्यामुळे त्यांना हरवणे सोपे नाही. मात्र, बॉर्डर-गावस्कर करंडक पुन्हा मिळवण्याचा आम्हाला विश्वास आहे,’’ असे स्टार्कने नमूद केले.

तसेच ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या दृष्टीनेही महत्त्वाची असल्याचे स्टार्कला वाटते. ‘डब्ल्यूटीसी’च्या गुणतालिकेत सध्या भारत अव्वल, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. ‘‘या मालिकेबाबत खेळाडूंप्रमाणेच चाहत्यांमध्येही खूप उत्सुकता आहे,’’ असेही स्टार्क म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दशकभराची प्रतीक्षा संपवण्याचा निर्धार स्मिथ

ऑस्ट्रेलियाला २०१४-१५ नंतर भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. आगामी मालिकेत ही प्रतीक्षा संपवण्याचा आमचा निर्धार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ म्हणाला. ‘‘सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन सर्वोत्तम कसोटी संघ आहेत. गेल्या वर्षी आमच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेचा अंतिम सामनाही झाला होता. आम्ही त्यात विजयी झालो. त्याआधी भारताने दोन वेळा आम्हाला मायदेशात हरवण्याची कामगिरी केली. त्यांनी खूप चांगला खेळ केला आणि त्याचे श्रेय त्यांना मिळाले पाहिजे. आम्ही दहा वर्षांपासून बॉर्डर-गावस्कर करंडक उंचावलेला नाही. ऑस्ट्रेलियन संघासाठी हे मोठे अपयश आहे. मात्र, आता हे अपयश पुसून टाकून भारताला नमवण्याचा आमचा मानस आहे,’’ असे स्मिथने एका मुलाखतीत सांगितले.