बार्सिलोना : बार्सिलोनाने दोन वेळा पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीत इंटर मिलानविरुद्धची पहिल्या टप्प्यातील लढत ३-३ अशी बरोबरीत सोडवली. परतीची लढत पुढील मंगळवारी (६ मे) मिलानच्या मैदानावर रंगणार आहे.

एकीकडे आक्रमकतेला प्राधान्य देणारा बार्सिलोना संघ, तर दुसरीकडे भक्कम बचावासाठी ओळखला जाणारा इंटर मिलान संघ. हे भिन्न शैलीत खेळणारे दोन संघ आमनेसामने आल्यावर लढत अत्यंत चुरशीची होणार अशी अपेक्षा होती आणि तसेच झाले. बार्सिलोनाने आधी ०-२, मग २-३ अशा पिछाडीनंतरही लढत बरोबरीत सोडविण्यात यश मिळवले.

इंटरने सामन्याच्या ३०व्या सेकंदालाच आघाडी घेतली. डेन्झेल डम्फ्रिसच्या पासवर आाघाडीपटू मार्कस थुरामने हा गोल नोंदवला. पहिल्या गोलसाठी साहाय्य (असिस्ट) करणाऱ्या डम्फ्रिसने २१व्या मिनिटाला स्वत:च गोल नोंदवत इंटरची आघाडी दुप्पट केली. यानंतर बार्सिलोनाने आक्रमणाला गती दिली. २४व्या मिनिटाला लामिन यमालने उजवीकडून गोलकक्षात मुसंडी मारत अप्रतिम गोल नोंदवला आणि बार्सिलोनासाठी आशेचा किरण निर्माण केला. दोनच मिनिटांनी पुन्हा यमालला गोलची संधी होती, पण इंटरचा गोलरक्षक यान सोमरने त्याने मारलेला फटका अडवला. बार्सिलोनाला बरोबरीसाठी फार वेळ वाट पाहावी लागली नाही. ३८व्या मिनिटाला राफिन्हाच्या पासवर फेरान टोरेसने गोल करत सामना २-२ असा बरोबरी आणला.

उत्तरार्धातही चुरस कायम राहिली. दोन्ही संघ एकमेकांच्या गोलवर हल्ला करताना दिसले. यात प्रथम इंटरला यश आले. ६३व्या मिनिटाला हकान चालोनोग्लूच्या क्रॉसवर डम्फ्रिसने हेडरच्या साहाय्याने गोल करत इंटरला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. परंतु ही आघाडी केवळ दोन मिनिटे टिकू शकली. ६५व्या मिनिटाला राफिन्हाने गोलकक्षाबाहेरून जोरदार किक मारली. ती अडवण्यासाठी इंटरचा गोलरक्षक सोमरने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्याला अपयश आले. चेंडू त्याच्या हाताला लागून गोलजाळ्यात गेल्याने बार्सिलोनाला ३-३ अशी बरोबरी साधता आली. अखेरच्या काही मिनिटांत बार्सिलोनाला आघाडी मिळवण्याची संधी होती. मात्र, यमालने मारलेला फटका ‘क्रॉसबार’ला लागला. त्यामुळे लढत बरोबरीतच सुटली.