ब्रिस्बन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अल्प कालावधीतच आपली छाप पाडणारा भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरीसाठी उत्सुक आहे. तसेच यशस्वी कामगिरी सुरू ठेवण्यासाठी दैनंदिन बाबींचे पालन व सरावाच्या प्रक्रियेत सातत्य राखणे गरजेचे असल्याचे सूर्यकुमार म्हणाला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रसिद्ध केलेल्या ध्वनीचित्रफितीत सूर्यकुमार म्हणाला की,‘‘पहिल्या सराव सत्रासाठी मी उत्साहित होतो. हे सत्र चांगले झाले. मला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे येथील खेळपट्टय़ांवर चेंडू किती उसळी घेतो हे मला पाहायचे होते.’’ भारतीय संघ २३ ऑक्टोबरला  पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

‘‘सरावासाठी माझ्यात खूप उत्साह होता, पण थोडेसे दडपणही होते. परिस्थितीशी जुळवून घेणे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. मी आपल्या दैनंदिन बाबींचे पालन करत होतो. सरावादरम्यान खेळपट्टीची गती आणि उसळी पाहणे गरजेचे होते. ऑस्ट्रेलियातील मैदानेही मोठे आहेत. त्यामुळे मैदानांनुसार रणनिती तयार करणे गरजेचे असते,’’ असे सूर्यकुमारने सांगितले.