Twitter removes BCCI Blue Tick: लॉडरहिल, फ्लोरिडा येथे वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोशल मीडिया साइट ट्वीटर (X ट्वीटर म्हणून ओळखले जाणारे चिन्ह) वरील ब्लू टिक गमावली. त्यामुळे या हँडलला कोणीतरी हॅक केले असावे किंवा अन्य काही कारण आहे असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आला आणि ते गोंधळात पडले, पण नंतर कळले की बीसीसीआयच्या हँडलवरील ही ब्लू टिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘हर घर तिरंगा’ या आवाहनामुळे गेली. कारण बीसीसीआयने पीएम मोदींच्या ‘युनिक’ आवाहनाला प्रतिसाद दिला आणि डीपी बदलला.
खरं तर, १५ ऑगस्ट रोजी ७७व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय तिरंगा ध्वजासह त्यांचे चित्र लावण्यास सांगितले. तसेच, सोशल मीडियावरील डीपी बदलण्याचे आवाहनही केले आणि हॅशटॅग ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली. खुद्द पंतप्रधानांनीही तेच केले आणि त्यांच्या या भूमिकेला प्रतिसाद देत बीसीसीआयनेही डीपी तिरंगा ठेवला. यामुळे दरम्यानच्या काळात बीसीसीआयची ब्लू टिक ट्वीटरने काढून घेतली. मात्र, “लवकरच बीसीसीआयला (X) ट्वीटरवर पुन्हा ब्लू टिक मिळेल. यामध्ये तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही,” असे ट्वीटरकडून सांगण्यात आले.


पीएम मोदींनी ट्वीटर वर पोस्ट करत लिहिले, “#हर घर तिरंगा मोहिमेच्या भावनेनुसार, आपण आपल्या सोशल मीडिया खात्यांचा डीपी बदलू या आणि आपला प्रिय देश तसेच, आपल्यातील बंध अधिक दृढ करणाऱ्या या अनोख्या प्रयत्नाला पाठिंबा देऊया.” पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बीसीसीआयनेही ट्वीटर हँडलवरील डीपी बदलला आहे. ट्वीटरवर पूर्वी बीसीसीआयचा लोगोचा फोटो डीपी म्हणून होता, पण आता त्या ठिकाणी भारताचा तिरंगा आहे. हेच बीसीसीआयने ब्लू टिक गमावण्याचे महत्वाचे कारण होते. कारण, ट्वीटरच्या नवीन नियमांनुसार, डीपी बदलल्यावर व्हेरीफाईड ब्लू रंगाची टिक काढून टाकली जाते.
बीसीसीआयला आता पुढील तीन-चार दिवसांत ट्वीटरवर ब्लू टिक परत येईल. खाते रिस्टोर करण्यासाठी कंपनी त्याचे पुनरावलोकन करेल आणि त्यानंतरच बीसीसीआयला ब्लू टिक मिळेल. हा फक्त ब्लू टिक मिळवण्याचा ट्वीटरचा एकच नियम आहे, तर पंतप्रधान मोदींना प्रोफाइल बदलण्यासाठी त्यांची व्हेरीफाईड टिक गमावण्याची गरजच नाही, कारण त्यांच्याकडे ग्रे टिक आहे आणि ही ग्रे टिक कोणत्याही सरकारी/बहुपक्षीय संस्था किंवा सरकारी/बहुपक्षीय अधिकाऱ्याना, राजकारणी, मोठ्या हुद्यावरील लोकांना दिली जाते.