Virat Kohli 500th Match: भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट कोहलीचे ५००व्या सामन्यापूर्वी कौतुक केले आहे. द्रविड म्हणाला की, “कोहलीने जे काही साध्य केले आहे आणि तो प्रत्येक सामन्यासाठी ज्या प्रकारे तयारी करतो, हे त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. विराट संघातील अनेक खेळाडूंसाठी प्रेरणा आहे.” वेस्ट इंडिजविरुद्ध क्वीन्स पार्क ओव्हल येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीत कोहली आपला ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. ही कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि एम.एस. धोनीनंतरचा चौथा भारतीय खेळाडू असेल.

कसोटी सामन्यापूर्वी द्रविड म्हणाला, “कोहलीची आकडेवारी स्वत: सांगते, की तो किती मोठा खेळाडू आहे. त्याच्या या आकडेवारीच्या पुस्तकात पाहिले तर अनेक विक्रम त्याने केलेले दिसतील. तो या संघातील अनेक खेळाडूंसाठी आणि भारतातील अनेक लोकांसाठी, युवा युवतींसाठी खरा प्रेरणास्थान आहे. विराटचा हा प्रवास पाहून मला खूप आनंद झाला. मी जेव्हा त्याच्यासोबत पहिल्यांदा खेळलो तेव्हा तो एक तरुण खेळाडू होता. मी त्याच्यासोबत जे काही खेळलो आहे ते पाहता मला त्याच्याबद्दल फारसे बोलता येणार नाही. मी निवृत्त झाल्यानंतर त्याने संघासाठी जे काही केले आहे त्याबद्दल मी त्याचा खूप ऋणी राहीन.”

द्रविड म्हणाला की, “कोहलीचा क्रिकेट विश्वातील प्रदीर्घ काळ आणि तिन्ही फॉरमॅटमधील यश हे पडद्यामागील त्याग आणि मेहनतीचे फळ आहे. तो अनेकांचे प्रेरणास्थान आहे पण खेळाडूंनी लक्षात घ्यायला हवे की तो दोनवर्ष वाईट फॉर्ममधून गेला होता. त्यातून तो कसा सावरला? हे देखील पाहणे गरजेचे आहे.” द्रविड पुढे म्हणाला, “मला माहित नव्हते की हा त्याचा ५००वा सामना होता. माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने पडद्यामागे केलेले प्रयत्न आणि काम पाहणे.”

हेही वाचा: IND vs WI: “मला असं वाटत की त्याने आक्रमक…”, रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत इशानला संधी देणार? जाणून घ्या

द्रविड म्हणाला की, “त्याने घेतलेली मेहनत जेव्हा कोणालाही दिसत नाही, तेव्हा ती पाहणे हे माझ्यासाठी खास क्षण आहेत. प्रशिक्षकासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण अनेक तरुण खेळाडू हे पाहतील आणि त्यांना प्रेरणा मिळेल. पडद्यामागे त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे हे घडले आहे. त्याने पडद्यामागे खूप परिश्रम घेतल्यामुळे आज हे दिवस त्याला आले आहेत. खूप मेहनत, शिस्त आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता यामुळेच खेळाडू मोठे होत जातात.”

ऑगस्ट २००८ मध्ये डांबुला येथे श्रीलंकेविरुद्ध धोनीच्या नेतृत्वाखाली वन डे पदार्पण केल्यापासून, ३४ वर्षीय कोहलीने खूप मोठा पल्ला गाठला आहे. त्याने ११० कसोटी, २७४ एकदिवसीय आणि ११५ टी२० सामने खेळले आहेत. सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा खेळाडू म्हणून तो इतिहासातील पाचवा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. वन डे मध्ये त्याने २७४ सामन्यांमध्ये ४६ शतकांसह १२८९८ धावा केल्या आहेत आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. कसोटी फॉर्मेटमध्ये त्याने ११० सामन्यांमध्ये ८५५५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा: IND vs WI: “मी जन्मालाही आलो नव्हतो…” वेस्ट इंडिजविरुद्धच्या १००व्या कसोटीआधी रोहित असं का म्हणाला? पाहा Video

स्वतः माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज असलेल्या द्रविडने सांगितले की, “कोहली लवकरच निवृत्त होण्याची चिन्हे दिसत नाहीत.” तो म्हणाला, “विराट ५०० सामने खेळू शकला आहे हे यावरून दिसून येते, तो अजूनही खूप तंदुरस्त आहे. त्याने खेळात जी ऊर्जा आणली आहे ती अविश्वसनीय अशा स्वरुपाची आहे. जवळपास १२-१३ वर्षांपासून तो खेळत आहे आणि ही खरोखरच विलक्षण गोष्ट असून ही कामगिरी करणे सोपे नाही. तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने आचरण करता, तुम्ही ज्या पद्धतीने सराव करता, तुमच्या फिटनेसबद्दल विचार करता, त्यामुळे अनेक तरुण खेळाडू बनतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द्रविड हा भारतीय कसोटी संघाचा भाग होता ज्याने कोहलीसोबत २०११ मध्ये वेस्ट इंडिजचा शेवटचा दौरा केला होता. मात्र त्यांनी कबूल केले की, अलीकडच्या काळातच त्यांचे नाते खरोखरच वाढले आहे कारण त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी समान ध्येय ठेवून एकमेकांसोबत काम करताना वेळ घालवला आहे. द्रविड म्हणाला, “गेल्या १८ महिन्यांत त्याला थोडेसे जाणून घेणे, त्याच्याशी संवाद साधणे, त्याला वैयक्तिकरित्या समजून घेणे खूप चांगला अनुभव होता. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि अनेक मार्गांनी मला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेता आला आणि आशा आहे की तो अशीच कामगिरी पुढे करत राहील.”