India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना यश्सवी जैस्वालने दमदार शतक झळकावलं. जैस्वालने १२५ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या संपूर्ण सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील खेळाडूंमध्ये वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला त्यावेळी असं वाटलं होतं की, इंग्लंडचे गोलंदाज भारतीय संघाचा डाव लवकर संपुष्टात आणतील. पण आकाशदीप आणि यशस्वी जैस्वाल यांनी मिळून शतकी भागीदारी केली. यादरम्यान यशस्वी जैस्वाल जेव्हा शतक झळकावून मैदानाबाहेर जात होता, त्यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी यश्सवी जैस्वाल घेरलं.
तर झाले असे की, जेव्हा सत्र संपायला केवळ १ चेंडू शिल्लक होता त्यावेळी यशस्वी कर्णधार शुबमन गिलकडे गेला. यशस्वी जैस्वालला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत होता. त्यामुळे तो शुबमन गिलसोबत चर्चा करत होता. यशस्वीला त्रास होत होता. पण इंग्लंडच्या खेळाडूंना वाटलं की, यशस्वी जैस्वाल वेळ वाया घालवत आहे. त्यामुळे जेव्हा सत्र संपलं आणि खेळाडू बाहेर जात होते त्यावेळी इंग्लंडचे खेळाडू पुढे येऊन यशस्वी जैस्वालची चौकशी करू लागले. आधी जॅक क्रॉली यशस्वी जैस्वालला विचारण्यासाठी पुढे आला. त्यानंतर बेन डकेटनेही विचारपूस करायला सुरूवात केली. पण जैस्वाल शांत बसला नाही, त्याने इंग्लंडच्या खेळाडूंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कुठलाही वाद झाला नव्हता. पण त्यानंतर तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये चांगलाच वाद रंगला होता. इथून पुढे शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये चांगलाच वाद रंगला. लॉर्ड्स कसोटी सामना सुरू असताना, चौथ्या दिवशी जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी फलंदाजीला यायला उशीर केला. त्यानंतर खेळ सुरू झाल्यानंतर वेळ वाया घालवला होता. यावरून कर्णधार गिल आणि जॅक क्रॉली यांच्यात चांगलाच वाद रंगला होता.
भारतीय संघाची आघाडी २५० पार
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव २२४ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने २४५ धावा करत भारतीय संघावर २३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून आकाशदीपने नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला येऊन ६६ धावांची खेळी केली. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने १६४ चेंडूंचा सामना करत ११८ धावांची खेळी केली. आकाशदीप आणि यशस्वी जैस्वाल यांनी मिळून १०० धावांची भागीदारी केली. यासह भारतीय संघाला २५० हून अधिक धावांची आघाडी मिळवून दिली.