Virat Kohli Break From White Ball: विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा विराट कोहलीने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्याआधीच एक मोठा निर्णय घेतला असल्याचे समजतेय. इंडियन एक्सस्प्रेसच्या माहितीनुसार विराट कोहलीने १० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेआधी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे सांगितले आहे. विराट कोहलीने बीसीसीआयला याबाबत कळवले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया, तीन टी-20 आंतरराष्ट्रीय, तीन एकदिवसीय सामने आणि त्यानंतर दोन कसोटी सामने खेळणार आहे. टी २० सामने आणि एकदिवसीय सामने खेळणार नसल्याचे कोहलीने स्पष्ट केले असले तरी यात कसोटी सामन्यांबाबत भाष्य केलेले नाही त्यामुळे कदाचित कोहली कसोटी सामन्यांसाठी मैदानांत उतरू शकतो असे समजतेय. २६ डिसेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती येत्या काही दिवसांत तिन्ही फॉरमॅटसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. कोहलीने घरच्या मैदानावर शानदार विश्वचषक खेळला होता ज्यात त्याने ११ डावांमध्ये ७६५ धावा केल्या, ज्यात तीन शतकांचा समावेश होता. त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरवण्यात आले.
इंडियन एक्सस्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “त्याने (कोहली) बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना कळवले आहे की त्याला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांतीची आवश्यकता आहे आणि व्हाईट बॉल क्रिकेट खेळण्यासाठी तो कधी तयार होईल हे कळवण्यासाठी तो त्यांच्याशी संपर्क साधून कळवेल. या क्षणी त्याने बीसीसीआयला कळवले आहे की तो रेड-बॉल क्रिकेट खेळणार आहे, याचा अर्थ तो दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांच्या संघात निवडीसाठी उपलब्ध आहे.”
हे ही वाचा<< “त्या लोकांची दूरदृष्टी..”, सुनील गावसकरांची ‘सचिन’साठी खास पोस्ट; तेंडुलकरची ‘कमेंट’ गुगली ठरली लक्षवेधी
प्राप्त माहितीनुसार, कोहली सध्या लंडनमध्ये सुट्टीवर आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो सलग सामने खेळत आहे. शेवटच्या वेळी कोहलीने सप्टेंबरमध्ये विश्वचषकापूर्वी विश्रांती घेतली होती, कोहली व रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली होती.