भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये ( बीसीसीआय ) अध्यक्षबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ( ११ ऑक्टोंबर ) बीसीसीआयची मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे. तर, सध्याचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ( आयसीसी ) पाठवण्यात येणार आहे.

मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे बीसीसीआयची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. तसेच, १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी चर्चा करण्यात आली.

हेही वाचा – MS धोनीला रुपेरी पडद्याची भुरळ, चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष, तर राजीव शुक्ला यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी असेल. जय शाह हे सचिवपदी कायम असणार आहेत. सौरभ गांगुलींना आयसीसीवर पाठवण्याची हालचाल सुरु आहे. सध्याचे बीसीसीआय खजिनदार अरुण धुमाळ यांची आयपीएल चेअरमनपदी तर, त्यांच्या जागी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खजिनदारपदासाठी आशिष शेलारांचे नाव समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, सोमवारीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या ( एमसीए ) अध्यक्षपदासाठी आशिष शेलारांनी अर्ज दाखल केला आहे. शेलार हे ‘शरद पवार-आशिष शेलार’ गटाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी शेलार आणि भारताचे माजी राष्ट्रीय प्रशिक्षण संदीप पाटील यांच्यात चुरस रंगणार आहे.

हेही वाचा – ख्रिस गेलचे भाकीत, विश्वचषकाची फायनल भारत-पाकिस्तानमध्ये नाही, तर ‘या’ दोन संघांमध्ये होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीसीसीआय अध्यक्षपदासाठी १८ ऑक्टोंबर रोजी निवडणूक होणार आहे. ११ आणि १२ तारखेला यासाठी अर्ज दाखल करण्यात येतील. १३ तारखेला अर्जांची छाननी, तर १४ तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे.